इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सत्तेसाठी इमान विकणाऱ्या, बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्या उबाठाला कोल्हापूरकरांनी विधानसभा निवडणुकीत कायमचे फेकून दिल्याबद्दल कोल्हापूरकर मतदारांचे अभिनंदन करायलाच हवे! वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर भूमिका घेतानाही उबाठा गटाचा वैचारिक गोंधळ उडाला आहे. काही लोकांचा चेहरा भोळा असतो पण भानगडी सोळा असतात. अशांना कोल्हापूरकरांनी वेळीच ओळखून विधानसभा निवडणुकीत तडीपार केल्याबद्दल कोल्हापूरकरांना मनापासून धन्यवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या आभार सभेला संबोधित करतांना शिंदे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातून महायुतीच्या सर्व, दहा आमदारांना निवडून देऊन उबाठाला हद्दपार केल्याबद्दल मतदारांचे आभार..जनतेच्या न्यायालयात जाऊ म्हणणाऱ्यांच्या १०० पैकी २० जागा निवडून आल्या, आम्ही ८० जागा लढलो आणि ६० आमदार निवडून आले. त्यामुळे आम्हीच उठाव करुन शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवला त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले असल्याचे यासमयी निक्षून सांगितले. दाढीवर दररोज कितीही टीका केलीत तरीही याच दाढीने तुमची मग्रुरी जिरवली. दाढीने तुमची महाभकास आघाडीची गाडी खड्ड्यात घातली हे विसरु नका, असा इशाराही यावेळी शिंदे यांनी दिला.
यावेळी आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार दिलीपराव माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार राजश्री जाधव, जिल्हाप्रमुख राजेंद्र माने, शिवसेना उद्योग आघाडीचे उदय सावंत तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि कोल्हापूरकर मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.