इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा मंगळवारी वरळीच्या एनएससीआय डोम सेंटरमध्ये संपन्न झाला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
यावेळी उबाठा गटाचे विलेपार्ले उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे, युवती सेनेच्या अजिता जनावळे, उपविभागप्रमुख अनिल खांडेकर, हनी सबलो, शरद पवार गटाचे मुंबई सचिव सतीश नायर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यासमयी शिवसेना नेते रामदास कदम, विधानसभेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार रवींद्र वायकर, आमदार प्रा. मनीषा कायंदे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम तसेच शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार, नेते, उपनेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर शिवसेनेने आता महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. उंच भरारी घेण्यासाठी गरुड (बाज) बनावे लागेल, धोकेबाज बनून चालणार नाही. आताशी फक्त समुद्र पार केला असून, अजून संपूर्ण अवकाश व्यापून टाकणे बाकी आहे, असे सांगत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.
मागील अडीच वर्षात सरकारने मुंबई आणि राज्यात केलेली कामे जनतेपर्यंत घेऊन जावे. प्रत्येक वॉर्डात शिवसेनेच्या शाखा आणि घर तिथे शिवसैनिक झाला पाहिजे, असे यासमयी नमूद केले. विधानसभेत एक झटका दिलाय आणि मुंबई महापालिकेत दुसरा झटका द्यायचा आहे, असे आवाहन यावेळी केले. त्यासाठी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी प्रत्येक वॉर्डात मतदार यादीतील १२३ नावे सदस्य म्हणून नोंद करायची असून प्रत्येक वॉर्डात १० हजारांहून अधिक सदस्यांची नोंदणी करावी असे निर्देश शिंदे यांनी दिले.