इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा उद्या थंडावतील. निवडणूक प्रचारातील अंतिम टप्प्यात आज शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी होती. त्यांच्या स्मृतिदिनी शिवसेना विरूद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. मुंबईत शिंदे गट आणि उद्धव
ठाकरे गटात पोस्टर वॉर सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला डिवचले आहे. ठाकरे गटावर जोरदार प्रहार चढवला आहे. या पोस्टरची मुंबईतच नाही, तर राज्यभर ‘सोशल मीडिया’वर पण चर्चा रंगली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे एक वक्तव्य शिंदे गटाने प्रसिद्ध केले आहे. विविध वृत्तपत्रात त्याची जाहिरात आणि होर्डिंग लावण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या छायाचित्रासह यामध्ये वाक्य देण्यात आले आहे. ‘मी, माझी शिवसेना कधीच काँग्रेस होऊ देणार नाही.’ असे बाळासाहेबांचे वाक्य प्रसिद्ध करण्यात आले आहे, तर उद्धव यांनी पण जाहिरात दिली आहे. भीती, भूक, भ्रष्टाचाराचा अंध:कार आता दूर करणार मशाल, असे वाक्य त्यावर लिहिले आहे. त्यात सर्वात खाली बाळासाहेबांची मशाल असे वाक्य लिहले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील अनेक आमदार बाहेर पडले. शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे आणि भाजप यांनी महायुतीचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून शिवसेनेतील दोन्ही गटात धुमश्चक्री सुरू असते. दोन्ही गट आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा करतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतसुद्धा दोन्ही गटांनी अनेक मतदारसंघात एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. अनेक ठिकाणी दोन्ही गटात चुरस आहे. काही ठिकाणी बंडखोरांनी दोन्ही गटाचे टेन्शन वाढवले आहे. शिंदे गट महाराष्ट्राच्या निवडणुकीत ८१ ठिकाणी जागा लढवत आहे. तर उद्धव ठाकरे गटाने ९५ मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत.