इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पालघर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापण्यात आले आहे. या मतदार संघात माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे वनगा हे प्रचंड नाराज झाले. त्यानंतर त्यांनी काल रात्रीपासून घर सोडले. ते कोठे गायब झाले याचा आता शोध घेतला जात आहे.
त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी सांगितले की, ते काल संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यांचे दोन्ही मोबाईल बंद आहेत. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी एका पिशवीत काही कपडे भरले होते. ती पिशवी घेऊन ते गेले. आम्ही त्यांचा वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा संपर्क झाला नाही.
काल उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या संयमाचा बांध फुटला होता. त्यांनी माझी फसवणूक झाल्याचे म्हटले. उध्दव ठाकरे हे देवमाणूस होते. मी घातकी माणसासोबत गेलो माझा घात झाला असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.