नाशिक – कोरोनाच्या संकट काळात प्रतिबंधक लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सध्या घराबाहेर पडावे लागत आहे. त्यांची गैरसोय होवू नये म्हणून तिडकेनगर, कर्मयोगीनगरच्या छत्रपती राजे संभाजी व्यायामशाळेतील माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे लसीकरण केंद्रात शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनचे कार्यकर्ते आपुलकीने विचारपूस करीत आधार देत आहेत. ज्यांना चालणे शक्य नाही अशांसाठी येथे प्रवेशद्वारापासून लसीकरण कक्षापर्यंत व्यवस्थित घेऊन जात, पुन्हा बाहेर आणण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे, यामुळे सर्वांनीच समाधान व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ञांकडून केले जात आहे. मात्र, प्रतिबंधक लसीकरणासाठी त्यांना आता केंद्रांपर्यंत जावे लागत आहे. वयोमानामुळे किंवा आजारपणामुळे रांगेत उभे राहणे अशक्य असते. त्यांचे हाल होवू नये म्हणून तिडकेनगरच्या छत्रपती राजे संभाजी व्यायामशाळेतील माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे लसीकरण केंद्र व परिसरात शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयूर आहेर, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, यशवंत जाधव, रवींद्र सोनजे, दिलीप दिवाने, प्रथमेश पाटील, संकेत गायकवाड (देशमुख), दीपक दुट्टे, धवल खैरनार, उज्ज्वला सोनजे, संगीता देशमुख, वंदना पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते विशेष काळजी घेत आहेत. केंद्राजवळ वाहनातून उतरल्यानंतर प्रवेशद्वारापासून कार्यकर्ते हात धरून किंवा ज्यांना चालता येत नाही त्यांना खुर्चीत बसवून लसीकरण कक्षापर्यंत आणतात, नंतरही व्यवस्थित वाहनापर्यंत पोहचवतात. त्यांच्या प्रकृतीविषयी सोबत आलेल्या नातेवाईकांकडून माहिती घेत डॉक्टरांची भेट घडवून आणली जाते. काय काळजी घेतली पाहिजे याविषयी समजावून सांगण्यात येते. लसीकरणाआधी जेवण केले आहे की नाही याची माहिती घेतली जाते. अशी मायेने काळजी घेत आधार दिला जातो. महापालिकेच्या डॉ. सुविधा वाठोरे, सिस्टर प्रज्ञा निकम, अर्चना पाटोळे, अर्जुन शिंदे, दीपक पवार, यज्ञेश शिंदे व टिम अतिशय आपुलकीने काम करीत आहे. त्यांचे चांगले सहकार्य मिळत आहे, याबद्दल शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आस्थेवाईकपणे विचारपूस आणि आपुलकीमुळे ज्येष्ठ नागरिक पाठीवर मायेचा हात फिरवित आशीर्वाद देतात. यातून ईश्वरसेवेचा आनंद मिळतो, अशी भावना शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख) यांनी व्यक्त केली.