इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला असून जिहाद ही संकल्पना केवळ इस्लाममध्ये नाही. ती भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मातही आहे, असे विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील यांनी केले आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या चरित्राचे प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
शिवराज पाटील यांच्या विधानामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. पुढे ते म्हणाले, इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद या संकल्पनेबाबत अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे. केवळ कुराणच नव्हे, तर महाभारतातील गीतेमध्ये आणि ख्रिश्चन धर्मातही हेच सांगितले आहे. श्रीकृष्णानेही अर्जुनाला जिहाद शिकवला आहे, असं शिवराज पाटील म्हणाले आहेत.
पाटील यांच्या विधानावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.“शिवराज पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्या काँग्रेसने रामाचं अस्तित्व नाकारलं, ज्या राहुल गांधींनी हिंदू दहशतवाद असा उल्लेख केला, तुकडे-तुकडे गँगचं समर्थन केलं, त्या पक्षाच्या नेत्याकडून इतर काही अपेक्षा करु शकत नाही,” असं ते म्हणाले आहेत. गीता इतका महान ग्रंथ आहे की, १० हजार वर्षानंतरही त्याची मोहिनी आज सगळ्या जगावर आहे. जगातील सर्व तज्ज्ञ, विचारवंत गीतेने भारावले असताना शिवराज पाटील त्याची तुलना जिहादशी करत आहेत. गीता कर्माचा संदेश देते. पण शिवराज पाटील यांचं डोकं सडलेलं आहे. खरं तर काँग्रेसची अख्खी विचारसरणी ही सडकी आणि नास्तिक आहे याचं उदाहरण हे वक्तव्य आहे.”
ट्विटरवरही टीका
पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर ट्विटरवरदेखील टीका केली जात आहे. काँग्रेस भगवा दहशतवाद संकल्पनेला जन्म दिला, राममंदिराला विरोध केला, प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वावर संशय घेतला, हिंदूत्वाची तुलना आयसिसशी केली, असे ट्विट भाजप नेते शहेजाद पुनावाला यांनी केले.
Shivraj Patil Controversial Statement
Arjun Geeta Shrikrishna Congress Politics