पुणे – एसटी कर्मचारी संघटनांनी संपाचे हत्यार उगारल्याने एसटी महामंडळाने आता आक्रमकरित्या पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. महामंडळाने तब्बल २०३५ कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्यानंतर आता शिवनेरी बसबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिवनेरी या बसची खासगी वाहनचालकांद्वारे सेवा सुरू करण्यात आली आहे. नाशिक आणि पुणे या दोन शहरांसाठी शिवनेरी बसची सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. एसटी कर्मचारी संघटनांमध्ये फूट पाडण्यासाठी सरकारने ही खेळी खेळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एसटी कर्मचारी संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. खासकरुन ग्रामीण भागात वाहतूक व्यवस्थेचा पुरता फज्जा उडाला आहे. दिवाळीनिमित्त घरी गेलेल्यांना पुन्हा शहराकडे किंवा आपल्या घराकडे परतण्यासाठी अनेक बाबींना तोंड द्यावे लागत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, समिती स्थापन करण्यात आली. तसेच, न्यायालयाने संप बंद करुन कामावर परतण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तरीही संप सुरूच आहे. संप नक्की कधी मिटेल, याची कुठलीही चिन्हे नाहीत. त्यामुळे सरकारने आता शिवनेरी बसच्या माध्यमातून सेवा सुरू केली आहे. नाशिक आणि पुण्यातील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील अन्य शहरांमध्येही शिवनेरीची सेवा सुरू करणार असल्याचे महामंडळ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, अशा प्रकारे शिवनेरीची सेवा देत असाल तर एसटी महामंडळाचा शिवनेरी बसवरील लोगो काढून घ्यावा, अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.