मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेमध्ये मोठी फूट पडल्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाला सावरताना काही कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. त्यातच आता उद्धव यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची जिल्हा प्रमुखपदावरुन तर तानाजी सावंत यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केले तेव्हा बांगर हे शिवसेनेमध्येच होते. बंडखोर आमदारांनी पुन्हा शिवसेनेत यावे, असे आवाहान देखील त्यांनी केले होते. मात्र बहुमत चाचणीच्या दिवशीच ते एकनाथ शिंदे गटला जाऊन मिळाले. संतोष बांगर यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्यावेळी शिवसेनेच्या बाजुने मतदान केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी बहुमत चाचणीच्या अवघ्या काही तास आधी ते शिंदे गटाला येऊन मिळाले.
बहुमत चाचणीत त्यांनी शिंदे गटाच्या बाजूने मतदान केले होते. याची गंभीर दखल आता शिवसेनेकडून घेण्यात आली असून, संतोष बांगर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. कारण शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी विश्वासदर्शक ठरावादरम्यान ऐनवेळी एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता बांगर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांची हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
सध्या शिवसेनेला धक्यांवर धक्के बसत आहेत. मात्र यानंतर शिवसेनेने बंडखोरांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. शिवसेना पक्षातील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्याबाबत शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेकडून तानाजी सावंत यांची शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती आहे. सोलापूर जिल्हा संपर्क पदावर अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तानाजी सावंत यांची हकालपट्टी आणि अनिल कोकीळ यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.
संतोष बांगर हे बंडखोरी करत शिंदे गटामध्ये सहभागी झालेल्या आमदारांपैकी शेवटच्या आमदारांपैकी एक आहेत. दरम्यान संतोष बांगर यांनी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं वारंवार सांगितले होते. त्यांनी मराठवाड्यात रस्त्यावर उतरून बंडखोरांचा निषेध केला होता. ढसाढसा रडत शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आवाहन देखील केले होते, मात्र काही तासांतच चित्र पालटलं आणि बांगर देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले.
शिवसेनेचा मराठवाड्यातील आक्रमक चेहरा म्हणून आमदार संतोष बांगर यांची ओळख आहे, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोकणात जाऊन कोथळा काढू अशी धमकी दिल्याने आमदार बांगर हे चर्चेत आले होते, आमदार बांगर हे कायम ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ होते मात्र , एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर त्यांनी देखील शेवटी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात एंट्री केली होती.
आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार बांगर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे सोलापूरमधील आमदार तानाजी सावंत यांच्याविरोधतही शिवसेनेने कठोर कारवाई केली आहे. सावंत हेदेखील बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीमध्ये मुक्कामी होते. याच कारणामुळे तानाजी सावंत यांना सोलापूर संपर्कप्रमुख पदावरुन हटवण्यात आले आहे.
Shivesna Chief Uddhav Thackeray Strict Action against two rebel Leaders Politics