इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर : महाविकास आघाडीसह आणि राहुल गांधी यांच्याकडे विकासाचे कुठलेही व्हीजन नाही. केवळ जाहीर सभामधून खोटी आश्वासने देत जनतेची दिशाभूल करतात. राज्यामध्ये महाविकास आघाडीकडे विकासाचे कुठलेही मॉडेल नसून ही केवळ महाविनाश आघाडी असल्याची टीका केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली.
चौहान नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. या वेळी शिवराजसिंह म्हणाले, की राहुल गांधी देशात एक आणि विदेशात वेगळे वक्तव्य करुन जनतेची दिशाभूल करतात. राज्यात महाविनाश आघाडी तयार करण्यात आली आहे. त्यांच्याजवळ विचार, व्यवहार आणि कुठलीही नीती नाही. जाती व धर्मावर केवळ राजकारण करण्याचे काम आघाडी सरकार करत आहे. मध्य प्रदेशमध्ये राबविण्यात आलेली लाडली बहीण योजना यशस्वी झाली आहे. तेथील गोरगरीबांना आर्थिक दृष्ट्यासक्षम करण्यासाठी योजना सुरू केल्यानंतर अनेक महिलांनी त्याच्या भरवश्यावर स्वत:चे उद्योग सुरू केले आहेत.
मध्य प्रदेश सरकार ही योजना चांगल्या पद्धतीने राबवित असून त्यासाठी १६ हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्या स्तरावर विविध योजना राबविल्या जात आहे. महाराष्ट्रात ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने सुरू असून लाखो महिलांना याचा लाभ मिळत आहे. महिलांचा सन्मान करणे ही महायुतीची संस्कृती आहे. त्यांनी जाहिरनाम्यात महिलांना तीन हजार रुपये देण्याची घोषणा केल; मात्र काँग्रेसच्या घोषणा फसव्या असतात, अशी टीका त्यांनी केली.
पामतेलावरील आयात शुल्क शून्यावरून २७.५ टक्क्यांपर्यंत वाढवून सोयाबीनच्या घसरलेल्या किमतींबाबत सरकारच्या प्रतिसादावर प्रकाश टाकला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेल्या मदत उपायांचाही उल्लेख केला आणि कृषी क्षेत्राला पाठिंबा देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला. महाविकास आघाडी फसवणूक करणाऱ्यांची युती आहे, अशी टीका त्यांनी केली.