लातूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाची ज्ञानेश्वरी माधव शिंदे हिची तलवारबाजीत इंग्लड येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने सी एस आर मधून एक लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,उपसंचालक श्री.सुधीर मोरे यांच्या सकारात्मकतेतून व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध करण्यात आला. लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून अशा निधीची सुरुवात करण्यात आली.
ज्ञानेश्वरीने इयत्ता पाचवी पासून तलवारबाजी खेळाला सरावाला सुरुवात केली. आजपर्यंत तीने राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत अनेक विजय मिळवून पदके प्राप्त केली आहेत. आता ती थेट तलवारबाजीच्या आंतरराष्ट्रीय मैदानात उतरली असून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चॅम्पियनशिपसाठी तीची निवड झाली आहे. ज्ञानेश्वरीची कौटुंबिक परिस्थिती फारसी चांगली नसून वडील नोकरी निमित्त बाहेर गावी असतात. आईच्या पाठीच्या मनक्यात गॅप आला असून ती अंथरुणाला खिळून आहे. अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरीने घेतलेली झेप, हे तीचे खेळा प्रती असलेलं समर्पण,परिस्थितीपुढे हार मानायची नाही ही जिद्द… या साऱ्या गुणामुळे ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचली आहे.
तिच्या घरची परिस्थिती बिकट आहे. ही बाब लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अभिजीत मोरे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर लकडे यांनी क्रीडा उपसंचालक लातूर व जिल्हा क्रीडा परिषद अध्यक्ष तथा लातूर जिल्हाधिकारी यांच्या समोर ठेवली. त्यातून तिला एक लाख रुपये देण्याचे मंजूर झाले. तलवारबाजी जिल्हा अध्यक्ष अभिजीत मोरे यांच्याकडे एक लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. कोणत्याही खेळाडूला खेळातील कोणतीच अडचण रोखू शकत नाही. खेळाडूंनी आपले योगदान देत रहावे. अडचणी क्रीडा विभाग संपवेल, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी श्री जगन्नाथ लकडे यांनी यावेळी व्यक्त केले.
स्पर्धा इंग्लड मध्ये होणार
या स्पर्धा इंग्लड मध्ये दि ०९ ऑगस्टला सुरुवात होऊन २८ ऑगस्ट पर्यंत चालणार आहेत. ज्ञानेश्वरी शिंदे ही भारतीय खेळ प्राधिकरण प्रशिक्षण केंद्र छञपती संभाजी नगर येथे सराव करत असून ती या स्पर्धेत पदक विजेती होईल अशी आशा तिचे प्रशिक्षक श्री मोरे यांना व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रयत्न करून ही मदत दिली त्याबद्दल तलवारबाजी जिल्हा संघटनेचे सचिव गलाले यांनी आभार व्यक्त केले. ज्ञानेश्वरीच्या निवडीबद्दल लातूरच्या क्रीडा क्षेञातून सर्वदूर कौतुक होत आहे. जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंचे ती प्रेरणास्थान बनली आहे.
Shirur Dnyaneshwari Shinde Fencing CWG22
Latur Sports