शिरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धुळे जिल्हयातील शिरपूर तालुक्यातील चरणपाडा येथे भाजप आमदार काशीराम पावरा यांच्या वाहनासह पोलीस व्हॅन व तहसील अधिकाऱ्यांची वाहने संतप्त जमावाने फोडली. बॅनर फाडल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर दगडफेकमध्ये झाले. संतप्त जमाव रस्त्यावर उतरल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.
या घटनेत काहीजण जखमी देखील झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले आहे. या दगडफेकीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलीस प्रशासन देखील मोठ्या फौज फाट्यासह घटनास्थळी उपस्थित झाले आहे. या घटनेनंतर जमाबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.