शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदनगर जिल्ह्याच्या सहलीवर असलेल्या दर्यापूर (जि.अमरावती) येथील अन्नातून विषबाधा झालेल्या ९४ मुले व ५ शिक्षकांना शिर्डीच्या साईनाथ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एकाच व्हिडिओ कॉलद्वारे मुले व शिक्षकांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. या रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नाही. असे रूग्णालय अधीक्षकांनी कळविले आहे .
मुले व शिक्षकांच्या प्रकृतीची सर्वातोपरी काळजी घेण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रितम वडगावे व प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिल्या आहेत. यावेळी तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते.
दर्यापूर (जि.अमरावती) येथील आदर्श हायस्कूल मधील २२७ मुले-मुली व १५ शिक्षक शैक्षणिक सहलीला निघाले होते. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी शेवगाव (जि.अहमदनगर) येथे स्वत:बनवलेले जेवण केल्यानंतर हे सर्वजण शिर्डी येथे आले. श्री.साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर देवगड (ता.नेवासा) कडे जाणार होते. रात्री ९ वाजता त्यांच्यापैकी ८४ मुले व ४ शिक्षकांना उलट्या व जुलाबाचा त्रास जाणवयास लागल्याने त्यांना शिर्डी येथील साईनाथ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी पुन्हा १० मुले व १ शिक्षक यांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व ९४ मुले व ५ शिक्षकांची प्रकृती उत्तम आहे.
श्री.साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, साईनाथ रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रितम वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अनंतकुमार भांगे, डॉ.उज्ज्वला शिरसाठ यांचे वैद्यकीय पथक रूग्णांवर उपचार करत आहे. सध्या सर्व मुले व शिक्षकांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नसल्याचे रूग्णालय प्रशासनाने कळविले आहे.
दरम्यान, रूग्णालयास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, राहाता तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय घोलप, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोकुळ घोगरे यांनी भेट देऊन रूग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
उपचार घेत असलेले शिक्षक राजेश पुरी यांनी सांगितले की, साईनाथ रूग्णालय प्रशासन आमची योग्य ती काळजी घेत आहे. आमच्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नाही. स्थानिक प्रशासनामार्फत आम्ही दर्यापूर (जि.अमरावती) प्रशासनाशी व मुलांच्या नातेवाईकांशी संपर्कात आहात.
#अमरावती दर्यापूरच्या आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांना काल जेवणातून विषबाधा झाल्याने त्यांना शिर्डीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.आज रत्नागिरी दौऱ्यावर असताना हीघटना समजताच व्हिडीओ कॉलवरून विद्यार्थ्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले. pic.twitter.com/jAcQ2jP8k1
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 17, 2023
Shirdi Student Teacher Food Poisoning Admitted in Hospital