शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे, अशी मागणी राज यांनी केली आहे. त्याची दखल घेत पोलिसांनी सर्वच धार्मिक स्थळांना नोटिस बजावली आहे. त्यात साईबाबा समाधी मंदिर संस्थांनचाही समावेश आहे. या नोटिशीची दखल घेत संस्थानने अखेर मोठा निर्णय घेतला आहे.
साई मंदिरात रोज पहाटे काकड आरती होते. तर, रात्री साडेदहा वाजता शेजारती होते. या दोन्ही वेळी लाऊडस्पीकर न वापरण्याचे संस्थानने जाहीर केले आहे. पोलिस प्रशासनाने संस्थानला सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सकाळी ६ ते रात्री १० वेळेतच लाऊडस्पीकरचा वापर करण्याचे निश्चित केले आहे.
दरम्यान, शिर्डीतील स्थानिक रहिवाशांमध्ये याबाबत तीव्र नाराजी आहे. कारण, पहाटेची काकड आरती लाऊडस्पीकरमुळे शिर्डीतील नागरिकांना घरामध्येच ऐकायला येते. आता लाऊडस्पीकर बंद केल्याने ही आरती सुरू झाली की नाही हे समजत नाही. तसेच, मंदिराच्या आवारात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्येही काकड आरतीबाबत संभ्रम असल्याचे दिसून येते. कारण, मंदिर आवारातील द्वारकामाई येथे काकड आणि अन्य आरती यांचे प्रक्षेपण तसेच लाऊडस्पीकरद्वारे ही आरती सुरू असते. मात्र, आता ती बंद झाल्याने भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.