शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिर्डीतील साईबाबांच्या आरतीसाठी आता शिफारस चालणार नाही, असा निर्णय आज शिर्डी संस्थानाने केला आहे. आता काऊंटरवरच आरती पास मिळणार असल्याचे संस्थानाने घोषित केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी फसवणुक व व्हीआयपी गर्दी नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो आणि उत्सव काळात लाखो साईभक्त येतात. झटपट दर्शन आणि आरती पास काढून देण्याच्या नावाखाली शिर्डीत अनेकदा साईभक्तांच्या फसवणुकीचे प्रकार घडतात. बरेचदा काही सुरक्षा रक्षकांना हाताशी धरून पैसे कमावण्याचा अनेकांनी धंदा सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर आरती पास घेण्यासाठी लागणारी शिफारस यामुळे भक्तांची लूट होत असल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले.
या सगळ्या मुद्यांना हात घालत ग्रामस्थांनी साईसंस्थानापुढे मागण्या मांडल्या. त्यानंतर शिफारशीशिवाय काऊंटवरून आरती पास वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे आता शिर्डीतील ग्रामस्थांना केवळ आधार कार्ड दाखवून दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. ग्रामस्थांसोबत अन्य कुणालाही सोडले जाणार नाही, असेही संस्थानाने स्पष्ट केले आहे. यासोबत सुरक्षारक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या मार्फत कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी संस्थानाच्या कर्मचाऱ्यांना मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. दर्शन अधिक सुकर व सोपे करण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांना दर्शनासाठी वेगळे प्रवेशद्वार ठरवून देण्यात आले आहे. संस्थान व ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल, असे स्पष्ट करण्यात आले.
भक्तांसोबत वाद नको
साई भक्तांसोबत वाद न घालता सामंजस्याने वागण्याचे आदेश शिर्डी संस्थानाने कर्मचाऱ्यांना दिले आहे. विशेषतः सुरक्षा रक्षकांना याबाबत विशेष काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षक आणि एका भक्तामध्ये मंदिरातच फ्री स्टाईल झाली होती. त्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानंतरच वाद न घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Shirdi Sai Temple Trust Big Relief Devotees