शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिर्डीतील साई बाबा संस्थानाने भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा निर्णय दर्शनाच्या संदर्भातील असल्यामुळे संपूर्ण देशातील भाविकांपर्यंत त्याची माहिती वेगाने पोहोचली आहे.
शिर्डीतील साईबाबा संस्थानाने गेल्या काही महिन्यांमध्ये असे काही निर्णय घेतले आहेत, जे भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी दर्शनासाठी लागणाऱ्या व्हीआयपी पासबद्दल संस्थानाने महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता साईबाबांचे संपूर्ण आयुष्य ज्या घरात गेले त्याबद्दल एक निर्णय संस्थानाने घेतला आहे.
साईभक्त शिर्डीत आले की, मुख्य दर्शन झाल्यानंतर ते द्वारकामाई मंदिरात दर्शनासाठी जातात. परंतु, हे मंदिर संस्थानाच्या नियमाप्रमाणे रात्री दहा वाजता बंद होते. त्यामुळे शिर्डीमध्ये उशिरा पोहोचणाऱ्या भाविकांना द्वारकामाईचे दर्शन घेता येत नाही. अनेक भाविक या दर्शनाला मुकतात. त्यामुळे अनेकांना निराश होऊन शिर्डीतून बाहेर पडावे लागते. अश्यात साईबाबा संस्थानाने हे द्वारकामाई मंदिर रात्री सुद्धा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सभामंडपातून दर्शन
शिर्डीतील साईबाबा संस्थानाने घेतलेल्या निर्णयामुळे विशेषतः बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांमध्ये आनंदाची लाट आहे. द्वारकामाईच्या गाभाऱ्यापर्यंत जाता येणार नसले तरीही सभामंडपातून सहज दर्शन घेता येणार आहे, असे संस्थानाने स्पष्ट केले आहे.
चोवीस तास गर्दी
शिर्डीमध्ये भाविकांची चोवीस तास गर्दी असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. भक्त निवासमध्ये मुक्काम करून किमान दोन दिवस तरी विविध ठिकाणांना भेटी देतात. पण बरेच लोक दर्शन घेऊन लगेच निघण्याच्या तयारीत असतात. अश्यांसाठी आता मोठी सोय झालेली आहे.
Shirdi Sai Baba Temple Trust Decision