शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील साई मंदिरात प्रवेश करतानाच साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा संदेशाचे स्मरण केले जाते. पण रामनवमीच्या उत्सवादरम्यान याच मंदिरात एका भाविकात आणि सुरक्षा रक्षकात फ्री-स्टाईल झाल्याचे लोकांनी बघितले. त्यामुळे अनेकांनी त्याचा व्हिडियो शूट करून तो सोशल मिडियावर व्हायरल केला आहे.
साईभक्ताच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भक्तांनीसुद्धा दर्शन घेताना, या परिसरात वावरताना नियमांचे पालन केले पाहिजे आणि सुरक्षा रक्षकांनीसुद्धा असा प्रसंग उदभवल्यास कायदा हातात न घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. यापूर्वीही अनेकदा शिर्डीत सुरक्षा रक्षक आणि साईभक्तांच्या वादाच्या घटना घडल्या आहेत. देशविदेशातील साईभक्त शिर्डीत आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्याशी आदराने आणि विनम्रपणे बोलायला हवे, यासाठी शेगावच्या धर्तीवर साइसेवक योजना सुद्धा राबविण्यात आली. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या शिर्डीत खऱ्या अर्थाने भक्तांनीसुद्धा नियमांचे पालन करण्याबरोबरच साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेणं योग्य नाही.
गेल्या तीन दिवसांपासून शिर्डीत रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून केवळ राज्यातून नव्हे देशभरातील लाखो भाविकांनी साईंच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. राज्यभरातून अनेक पायी पालख्या देखील शिर्डीत आल्या. मुंबईहून शिर्डीत पायी पालखी घेऊन येणाऱ्या अशाच एका साईभक्त आणि साईबाबा संस्थान सुरक्षारक्षकात शुक्रवारी दुपारी मारहाणीची घटना घडली. मंदिर परिसरातून बाहेर पडलेल्या एका भक्ताने पाच नंबर एक्झिट गेटमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न. मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला मज्जाव केल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वादावादी झाली आणि त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
उत्सवाच्या सांगतेलाच मारहाण
तीन दिवसीय रामनवमी उत्सवाच्या सांगतेच्या दिवशीच शिर्डीत सुरक्षा रक्षक आणि साईभक्तांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे. समाज माध्यमात या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिर्डी पोलीसांनी भक्ताच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकाच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. भक्तांनी दर्शन घेताना नियमांचं पालन केलं पाहिजे तर सुरक्षा रक्षकांनी अशा प्रसंगी कायदा हातात न घेता पोलिसांना माहिती दिली पाहिजे असं पोलिसांनी स्पष्ट केलं.
शिर्डीत साई संस्थानचे सुरक्षारक्षक आणि साईभक्तांमध्ये हाणामारी pic.twitter.com/BqdEooU3rg
— News18Lokmat (@News18lokmat) March 31, 2023
Shirdi Sai Baba Temple Security Guard Devotees Fight Video Viral