शिर्डी – अहमदनगर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती लक्षात घेता धार्मिक स्थळांवर व प्रार्थनास्थळांवर कोरोना नियमावलीचे कोटकोरपणे अंमलबजावणी होईल, याची दक्षता मंदिर प्रशासन व शासकीय विभागाने घ्यावी. तसेच शिर्डी श्री.साईबाबा मंदिरात ऑनलाईन पास असलेल्या भक्तांनाच प्रवेश दिला जाईल. दररोज 15 हजार भक्तांना प्रवेश दिला जाईल. प्रसादालय बंद ठेवण्यात येईल. अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिली.
दि.७ ऑक्टोंबर पासून धार्मिकस्थळे भक्तांसाठी सुरू करावयाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक श्री.साईबाबा संस्थानच्या सभागृहात आज संपन्न झाली. डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यावेळी श्री.भोसले बोलत होते.
श्री.भोसले म्हणाले, शासनाच्या 11 ऑगस्ट 2021 च्या मार्गदर्शक सूचनांची जिल्ह्यातील धार्मिक स्थळे सुरू करतांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रत्येकाने 6 फुटांचे अंतर पाळणे, मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक व सॅनिटायझरने वारंवार हात धुणे, या कोरोना नियमावलींचे मंदिर व परिसरात सक्तीने अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच मंदिर प्रवेशापूर्वी प्रत्येक भक्तांचे थॅर्मल स्कॅनरद्वारे शरिराचे तापमान तपासले जाईल.
कोवीड-19 ची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. यामध्ये 10 वर्षाखालील बालकांना, गरोदर स्त्रिया, 65 वर्षावरील व आजारी व्यक्तीत तसेच मास्क न वापरणा-या भक्तांना जिल्ह्यातील मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मंदिर परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने रात्री साडेआठ वाजेनंतर बंद करण्यात याव्यात.
मंदिरात प्रवेश देतांना कोवीड लसीकरण प्रमाणपत्र देण्याची सक्ती केली जाणार नाही. दर्शनासाठी येतांना पुजेचे साहित्य आणू नये. पुजेच्या साहित्यासह आत प्रवेश दिला जाणार नाही. मात्र जास्तीत जास्त भाविकांनी कोरोना लसीकरण करूनच मंदिर प्रवेश करावा. असे आवाहन श्री.भोसले यांनी यावेळी केले.
बैठकीत शिर्डी , शनिशिंगणापूर, मोहटे व राशिन देवस्थान च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व पदाधिकारी यांच्यांशी मंदिर नियमावली बाबत चर्चा केली. मंदिर प्रशासनाचे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या हमीपत्रांवरील बाबींवर चर्चा झाली. त्यानंतर अहमदनगर जिल्हयातील कोवीड परिस्थिती लक्षात घेता. कोवीड मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे सर्वानुमते ठरल्यानंतर सर्व विभागांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, अहमदनगर उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जून , शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, पाथर्डी उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, कर्जत उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले, निवासा उपविभागीय अधिकारी गणेश पवार, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, राहाता पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, राहाता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के तसेच इतर सर्व शासकीय विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मोहटे (पाथर्डी) श्री जगदंबा देवी सार्वजनिक देवी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, शनिशिंगणापूर श्री शनैश्वर देवस्थान, राशिनच्या जगदंबा देवी पब्लिक ट्रस्ट चे पदाधिकारी ही यावेळी उपस्थित होते.