शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शुक्रवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ ते रविवार दिनांक १३ ऑक्टोबर या काळात श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव साजरा होत असून, या उत्सवात सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने आयोजित केलेल्या १०६ वा श्री पुण्यतिथी उत्सवाची तयारी पुर्ण झाली असून मुंबई येथील व्दारकामाई मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व “श्री साई तिरुपती देखावा” हा भव्य देखावा गेट क्र. ४ चे प्रवेशव्दारावर उभारण्यात आला आहे. तसेच उत्सवकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
श्री गाडीलकर म्हणाले, जगभरात श्री साईबाबांचे लाखो साईभक्त आहेत. हे साईभक्त श्री पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आपल्या सदगुरुंचा आशिर्वाद ग्रहण करण्याकरीता शिर्डीला येतात. त्यामुळे श्रींच्या समाधीच्या दर्शनाकरीता साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरासह चावडी समोर, मारुती मंदिर ते शामसुंदर हॉल, समाधी मंदिराच्या दक्षिण बाजुकडील पालखी मार्ग, साई उद्यान परिसर व नविन श्री साईप्रसादालय परिसर आदि ठिकाणी ५० हजार चौरस फुटाचे मंडप तसेच अतिरिक्त निवासव्यवस्थेसाठी भक्त निवासस्थान येथे २० हजार चौरस फुटाचा असा एकुण ७० हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे.
श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाकरीता श्री साई प्रसादालयामध्ये उत्सवाचे पहिल्या दिवशी मुगडाळ शिरा, मुख्य दिवशी बालुशाही व तिसरे दिवशी लापशी हे मिष्ठान्न म्हणून प्रसाद भोजनात देणेत येणार आहे. तसेच साईभक्तांकरीता सुमारे ११० क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद व मोफत बुंदी प्रसाद पाकीटे तयार करण्यात आलेले असून उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी वेगवगळया ११ ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आलेले आहे. नवीन दर्शनरांग, श्री साईनाथ मंगल कार्यालय, साईकॉम्पलेक्स, गेट नं.०४ जवळ आतील बाजु, व्दारकामाई समोरील खुले नाटयगृह, सेवाधाम, श्री साईप्रसादालय व सर्व निवासस्थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आलेले आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास अतिरिक्त लाडू विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. दर्शनरांगेत व परिसरात भक्तांना चहा, कॉफी व दुध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्प्लेक्स, साईआश्रम, धर्मशाळा, भक्तनिवासस्थान (५०० रुम), व्दारावती भक्तनिवासस्थान तसेच साई उद्यान इमारत परिसर, शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत तळमाळा व पहिल्या माळ्यावर चहा व कॉफीची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सव काळात भक्तांच्या सोयीसाठी साधारण ०८ ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. गुरुस्थान मंदिरासमोर दिक्षीत वाडा, दर्शनरांग, नविन भक्तनिवासस्थान (५०० रुम), साईआश्रम, श्री साईप्रसादालय व मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडप आदि ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात येणार असून तातडीचे सेवेसाठी मंदिर परिसरात, नविन भक्तनिवासस्थान व नविन श्री साईप्रसादालय येथे रुग्णवाहीका तैनात ठेवण्यात येणार आहे. तसेच संस्थानच्या वतीने श्री साईबाबा मंदिर, मंदिर परिसर, सर्व निवासस्थाने, श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात येणार आहे.
श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या प्रथम दिवशी शुक्रवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणुक, पहाटे ०६.०० वाजता व्दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायणास सुरवात, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत श्री शंकर गिरी अंबड, जालना यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती, दुपारी ०१.०० ते ०३.०० यावेळेत श्रीम.अश्विनी सरदेशमुख, मुंबई यांचा ‘साईगीतांजली’ कार्यक्रम, दुपारी ०४.०० वाजता ह.भ.प. श्री प्रणव जोशी , जालना यांचा कीर्तनाचा कार्यक्रम तर सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती होईल. रात्रौ ०७.०० ते ०९.३० यावेळेत साईद्वारकामाई, बोरीवली, मुंबई यांचा ‘साईराम संगीत संध्या’ हा कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती (पालखी मिरवणुक परत आल्यानंतर)होणार आहे. उत्सवाचा हा पहिला दिवस असल्यामुळे अखंड पारायणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहील.
उत्सवाचे पारायणात अध्याय वाचनासाठी भाग घेऊ इच्छिणारे साईभक्तांनी गुरुवार, दि. १०/१०/२०२४ रोजी दुपारी ०१ ते सायंकाळी ०५.१५ वाजेपर्यंत देणगी काऊंटर नंबर १ येथे आपली नावे नोंदवावीत. नांव नोंदणी केलेल्या साईभक्तांची त्याच दिवशी संध्याकाळी ०५.२० वाजता समाधी मंदिरातील स्टेजवर चिठ्ठया काढुन ( ड्रॉ पध्दतीने ) अध्याय वाचनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजेच्या दरम्यान त्या भाग्यवान अध्याय वाचकांची नांवे व्दारकामाईचे बाहेरील दर्शनीय भागात व समाधी मंदिरचे उत्तर बाजूचे फलकावर लावले जातील.
उत्सवाच्या मुख्य दिवशी शनिवार, दिनांक १२ ऑक्टोबर रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम,सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.डॉ.सविता मुळे, छ.संभाजीनगर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, तसेच सकाळी १०.३० वाजता श्रींचे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती तर दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत श्री साईसेवा मंडळ, वर्धा यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम,दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. सौ.माधुरी चंद्रकांत गुंजाळ, संगमनेर यांचा ‘साईभजन संध्या’ कार्यक्रम, सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती होईल. सायं.०७.०० ते ०८.३० वा.श्रीमती पुजा चड्डा, दिल्ली द्वारा नाना वीर, शिर्डी यांचा ‘साईभजन संध्या’ कार्यक्रम व रात्रौ ०८.३० ते १०.०० यावेळेत श्री.योगेश तपस्वी, कर्वे नगर, पुणे यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून श्रींच्या रथाची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० यावेळेत श्रींच्या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम होईल. तर उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्यामुळे दिनांक १२ ऑक्टोबर रोजी रात्रौ १०.०० वाजता होणारी शेजारती व दिनांक १३ ऑक्टोबर रोजी पहाटेची ०५.१५ वाजता होणारी काकड आरती होणार नाही.
ज्या साईभक्तांना भिक्षाझोळी कार्यक्रमात भाग घ्यावयाचा असेल त्यांनी आपली नावे शुक्रवार दि. ११/१०/२०२४ रोजी सकाळी ०८ ते ११.३० या कालावधीत देणगी काऊंटर नंबर १ येथे नोंदवावीत. नांव नोंदणी केलेल्या साईभक्तांची त्याच दिवशी समाधी मंदिरातील स्टेजवर दुपारी १.३० चे दरम्यान लहान मुलांचे हस्ते ड्रॉ पध्दतीने २० चिठ्ठया काढण्यात येतील व भाग्यवान भिक्षा झोळीधारकांची नांवे जाहिर केली जातील. हि नावे समाधी मंदिरचे बाहेरील उत्तर बाजूचे फलकावर लावणेत येतील.
उत्सवाच्या तृतीय दिवशी (सांगता दिनी) रविवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी पहाटे ०५.५० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०६.५० वाजता श्रींची पाद्यपूजा व सकाळी ०७.०० वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० ते १२.०० वाजता ह.भ.प.श्री कैलास खरे, रत्नागिरी यांचा गोपालकाला किर्तन व दहिहंडी कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजेच्या दरम्यान श्रींची माध्यान्ह आरती होईल. दुपारी ०१.०० ते ०३.०० श्री उदय दुग्गल, पुणे यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. श्रीम.ललिता पांडे, जोगेश्वरी यांचा ‘साई स्वराधना’ कार्यक्रम, तसेच सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती, सायं. ०७.०० ते ०९.३० यावेळेत सक्सेना बंधु, दिल्ली यांचा ‘साईभजन संध्या’ कार्यक्रम होईल. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल. उत्सवकाळात कीर्तन कार्यक्रम आणि निमंत्रीत कलाकारांचे कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर होणार आहे.
तसेच उत्सवाच्या मुख्य दिवशी शनिवार १२ ऑक्टोबर रोजी रात्रौ १०.०० ते ०५.०० यावेळेत होणा-या कलाकारांच्या हजेरी कार्यक्रमासाठी इच्छुक कलाकारांनी आपली नावे त्याच दिवशी अनाऊंसमेंट रुम येथे आगाऊ नोंदवावीत, असे सांगुन उत्सवाच्या कालावधीत श्री साईसत्यव्रत पुजा (सत्यनारायण पुजा), अभिषेक पुजा व वाहन पुजा बंद ठेवण्यात येणार असल्याचे ही श्री गाडीलकर यांनी सांगितले.
हा उत्सव यशस्वरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजु शेंडे (सोनटक्के), तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, भा.प्र.से. व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे प्र.उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदिपकुमार भोसले, सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशिल आहे.