शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या बाहेर नागालँडमध्ये विधानसभेच्या दोन जागा जिंकून अख्ख्या देशाचे लक्ष वेधून घेतल्यानंतर आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी लोकसभेसाठी महाराष्ट्रात दोन जागांवर दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत शिर्डीसह दोन जागा मागण्याची तयारी त्यांनी केली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुरुवातीपासून ज्याची सत्ता असेल त्याच्यासोबत राहण्याची भूमिका ठेवली आहे. आताही त्यांचा पक्ष २०१४ पासून भाजपबरोबर सत्तेत आहे. स्वतः आठवले देखील मंत्री आहेत. आता पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी त्यांनी सुरू केली आहे. त्यादृष्टीने रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक अलीकडेच घेण्यात आली.
या बैठकीत पुढील वर्षीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपबरोबर युती कायम ठेवण्याचा निर्णय झाला. तसेच नागालँडमधील विजयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये दहा जागा मागण्याच्या बाबतीतही चर्चा झाली आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले. भाजपने रिपब्लिकन पार्टीसाठी लोकसभा निवडणुकीत दोन तर विधानसभा निवडणुकीत दहा जागा सोडाव्या, असा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला.
पुढील वर्षीची लोकसभा व विधानसभा निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढविण्याची तयारी रिपब्लिकन पार्टीने केली आहे. त्यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रात जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये रण पेटले असताना भाजप निश्चिंत आहे. मात्र भाजपला शिंदे गटाला सोबत ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी तडजोड करावी लागणार आहे. अश्यात आरपीआयसारख्या मित्र पक्षांनाही सोबत घेऊन चालावे लागणार आहे.
तरीही निवडणूक लढणार
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्यसभेचे सदस्य असून त्यांची मुदत २०२६ ला संपणार आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीनंतर भाजप पुन्हा सत्तेत आले तर आठवले यांच्या जागेला कुठलाही धोका नसणार आहे. पण, तरीही त्यांनी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतरादसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.
दहा जागांचे आव्हान
भाजपसोबत निवडणूक लढविताना रामदास आठवले यांच्यापुढे जागा मागण्याचे मोठे आव्हान आहे. कारण यावेळी शिंदे गटासह आणखीही मित्र पक्ष भाजपसोबत एकत्र लढणार आहेत. अश्यात भाजपकडून विधानसभेसाठी दहा जागांची अपेक्षा करणे आणि त्या मिळविणे हे आव्हानात्मक ठरणार आहे.
https://twitter.com/RamdasAthawale/status/1663034653044002816?s=20
Shirdi RPI Ramdas Athawale Election Seats Demand