इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिर्डीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जातनिहाय जनगणना करायला लावावे, असे आव्हान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी दिले आहे.
प्रियंका यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली सभा शिर्डीमध्ये झाली. या वेळी प्रियंका यांनी राज्य तसेच केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बाळासाहेब ठाकरे आणि आमचे विचार वेगळे आहेत; मात्र त्यांच्याविषयी कायमच आमच्या मनात आदर असल्याचे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रातील अनेक उद्योग परराज्यात गेल्यावरून प्रियंका यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील अनेक उद्योग मागील दहा वर्षात दुसऱ्या राज्यात गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. अडीच वर्षांचा अपवाद वगळता मागील दहा वर्षापासून राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यांनी महाराष्ट्राला कमजोर करण्याचे काम केले त्या म्हणाल्या.
राज्यात मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे, तर दुसरीकडे कराच्या माध्यमातून राज्यातील जनतेकडून पैसा वसून केला जात आहे. निवडणुका आल्यानंतर लाडकी बहिण योजनाा लागू करण्यात आल्याचा आरोप प्रियंका यांनी केला. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या हातात पंधराशे रुपये टेकवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आली की तीन-चार महिने आधी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पंधराशे रुपये दिले गेले आणि महिला आम्हाला मतदान करतील असे त्यांना वाटत आहे; मात्र बहिणींनी लक्ष्यात ठेवावे, अडीच वर्षापासून राज्यात यांचे सरकार आहे, तर दहा वर्षापासून केंद्रातही यांचेच सरकार आहे. असे असताना आताच पैसे का दिले जात आहेत? असा प्रश्न प्रियंका यांनी उपस्थित केला.
देशभरातील शेतकरी आज संकटात आहे. कापसाला, सोयाबीनला भाव मिळत नाही. दुसरीकडे तुम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करता. कांद्यावर निर्यात बंदी लावली आणि कांद्याचे भाव पाडण्यात आले. दुसरीकडे कापूस आयात करून कापसाचे भावदेखील पाडण्यात आले असल्याचा आरोप प्रियंका यांनी केला आहे.