शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेऊन श्री साईबाबा वस्तुसंग्रहालयास भेट दिली. श्री साईबाबा मंदीर दर्शन झाल्यानंतर श्री साईबाबा प्रसादालयात राष्ट्रपतींनी प्रसादाचा आस्वाद घेतला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंदिरात आगमन झाल्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री.साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवाशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे श्री साईबाबा मंदिरात आगमन झाल्यावर प्रथम त्यांनी ‘द्वारकामाई’ चे दर्शन घेतले. त्यानंतर श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेत पाद्यपूजा व आरती केली. समाधी मंदिर दर्शनानंतर गुरूस्थान मंदीर येथील निंबवृक्षास प्रदक्षिणा मारली. श्री साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या वस्तू ठेवण्यात आलेल्या श्री साईबाबा वस्तुसंग्रहालयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भेट दिली. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवाशंकर यांनी त्यांना वस्तुसंग्रहालयातील वस्तू आणि प्रतिमांविषयी माहिती दिली.
अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सन्मानचिन्ह देऊन राष्ट्रपतींचा सत्कार केला. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवाशंकर यांनी राष्ट्रपतींचा श्री साईबाबा यांची मूर्ती भेट देत सन्मान केला.
श्री साईबाबा मंदीर दर्शन झाल्यानंतर श्री साईबाबा प्रसादालयात राष्ट्रपतींनी प्रसादाचा आस्वाद घेतला.
भाविकांच्या शुभेच्छांचा स्वीकार – श्री साईबाबा मंदीर दर्शन झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या सुरक्षा वाहनांचा ताफा प्रसादालयाकडे मार्गक्रमण करत असतांना गेट नंबर १ येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ताफ्यातील गाड्या थांबवत गाडीतून खाली उतरत काही पावले चालत जाऊन सर्वसामान्य भाविकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. राष्ट्रपतींच्या या साधेपणाचे भाविकांना कौतूक वाटले.