शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रीयन जेवणात ताट विविध प्रकाच्या पदार्थांनी भरलेले असते. लोणची, पापड, कोशिंबीर यासोबतच विविध प्रकारच्या चटण्या कायम ताटात दिसतात. ही डावीकडची तोंडीलावणी जेवणाची लज्जत आणखीनच वाढवतात. या चटण्यांमध्ये शेंगदाणा चटणी ही चटण्यांमध्ये अग्रस्थानी असते. पश्चिम महाराष्ट्रातली ही चटणी घराघरात केली जाते. या चटणीच्या लोकप्रियतेमुळे हल्ली दुकाने, मॉल या सगळ्या ठिकाणी ही चटणी सहज मिळते. या चटणीची भुरळ देशाच्या राष्ट्रपतींना देखील पडली असून या चटणीला आता राष्ट्रपती भवनाच्या शाही जेवणात स्थान मिळणार आहे. सामान्यांच्या ताटात नित्याची असणारी शेंगदाणा चटणी तसेच सर्वसामान्यांचा आवडता वडा-पाव लवकरच राष्ट्रपतींच्या भोजनात समाविष्ट होणार आहे. या पदार्थांसह अन्य महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची रेसिपी शिकवण्यासाठी साई संस्थानच्या आचाऱ्यांना राष्ट्रपती भवनात निमंत्रित केले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ७ जुलै रोजी साईदर्शनाच्या निमित्ताने शिर्डीत आल्या. त्यावेळी त्यांनी साई संस्थानच्या प्रसादालयात जेवणाचा आस्वाद घेतला. यात गावरान मटकी, मेथी, बटाटा भजी, डाळ – भात, पोळी, बटाटे वडा, पाव, शिरा, बुंदीचा लाडू, तसेच विविध प्रकारच्या चटण्यांचा समावेश होता. राष्ट्रपतींना जेवण आणि त्यातही विशेषतः शेंगदाणा चटणी जास्त भावली. जेवणानंतर त्यांच्या आचाऱ्यांनी चटणीची रेसिपी जाणून घेत त्याचा एक नमुना देखील सोबत नेला. त्यानंतर आता राष्ट्रपती भवनाकडून १५ पंधरा दिवसांसाठी संस्थानाकडे आचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पर्यवेक्षक प्रल्हाद कर्डिले आणि आचारी रवींद्र वहाडणे यांना दिल्लीला पाठवण्यात येणार आहे.
साई संस्थानच्या प्रसादालयात ५० रुपये आकारून देण्यात येणाऱ्या व्हीआयपी जेवणात या चटणीचा समावेश असतो. राष्ट्रपतींच्या पसंतीनंतर या चटणीला शाही चटणी अशी नवी ओळख मिळणार आहे. साईबाबांच्या द्वारकामाईतील न्याहरीच्या आणि समाधी मंदिरातील दुपारच्या नैवेद्यात या चटणीचा समावेश असतो. शेतकरी कुटुंबातील रवींद्र वहाडणे हा संस्थानात आचारी आहे. दोघांच्या प्रवास निवासाची व्यवस्था दिल्लीतून करण्यात आली आहे. आयएसओ मानांकन आणि सामान्य भाविकांसाठी विनामूल्य असलेल्या संस्थान प्रसादालयात वर्षाकाठी दीड ते पावणेदोन कोटी भाविक भोजन घेतात.