मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेष्ठ राजकीय विश्लेषक ताराचंद म्हस्के पाटील हे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात दाखल झाले. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत राष्ट्रवादी भवनात प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी च्या महिला प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण, प्रदेश युवक चे अध्यक्ष मेहबूब शेख पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे हे मान्यवर उपस्थित होते
ताराचंद म्हस्के पाटील हे गेली ३७ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. परखड, अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. जर्नालिझम मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन चे शिक्षण घेतलेले ते नगर जिल्ह्यातील पहीले पत्रकार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेशी त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत. मुंबईत बेलार्ड इस्टेट परिसरात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या मुख्यालयात सकाळी अकरा वाजता हा पक्ष सोहळा झाला.
यावेळी अजित पवार म्हणाले की, अतिशय परखड मते मांडण्याचे काम अनेक वर्षे ज्येष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के पाटील यांनी केलेले आहे. मागे मी व दिलीप वळसे पाटील शिर्डीच्या दौऱ्यावर गेलोअसतांना आम्ही सर्वांनी त्यांना ताराचंद म्हस्के विनंती केली होती की, तुम्हाला पवार साहेबांचे विचार माहीत आहेत. आम्ही सर्व जाती पंथांना बरोबर घेऊन जाणारे असल्याने तुमच्या सारख्यांचे सहकार्य मिळाले तर आणखी त्यात चांगली भर पडणार आहे. मी व दिलीप वळसे पाटील यांनी म्हस्के पाटील यांना पक्षात येण्याची विनंती केली व त्यांनीही आज पक्षात प्रवेश घेऊन आमचा मान ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचे स्वागत आहे, असे अजित पवार म्हणाले.
म्हस्के पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे नगर जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट होण्यासाठी नक्कीच सहकार्य मिळेल. पक्षाचे विचार व ध्येय धोरणे शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्याचे काम होईल. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षासाठी हा पक्ष प्रवेश प्रभावी ठरेल असा विश्वास व्यक्त करून अजित पवार यांनी ताराचंद म्हस्के पाटील यांचे पक्ष प्रवेशाचे स्वागत केले. या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला महिला प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, युवक चे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, उपाध्यक्ष अमोल मातेले हे मान्यवर उपस्थित होते.
पक्ष बळकटी साठी प्रयत्न करणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेले ज्येष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के पाटील यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हणाले,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे सर्व जाती,पंथ, धर्म यांना सोबत घेऊन समाज कार्य करत असल्याने त्यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर पडला आहे. तसेच पक्षाचे जेष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील हे मातब्बर नेते सुद्धा सर्वच जाती धर्मियांना सोबत घेऊन कांम करणारे आहेत. समाजाला योग्य मार्ग दर्शन ते करतात. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वच घटकांचे हित जोपासणारा व त्यांचे सुख दुःख जाणणारा पक्ष आहे. अशा पक्षात काम करण्याची मोठी संधी मला मिळाली आहे. पक्ष बळकटी साठी जाणीवपूर्वक प्रयत्न करील असा विश्वास ताराचंद म्हस्के पाटील यांनी व्यक्त केला.