शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काळानुरूप लोकांच्या सामाजिक जाणिवा चांगल्याच प्रगल्भ झालेल्या दिसतात. पूर्वी केवळ आपल्या कुटुंबापुरते मर्यादित असलेले कार्यक्रम आता कोणत्या ना कोणत्या आश्रमात किंवा सामाजिक संस्थांना देणगी देत साजरे होऊ लागले आहेत. असाच एक उपक्रम शिर्डीतील कोते दाम्पत्याने राबवला आहे. गेली जवळपास २२ वर्षे हा उपक्रम सुरू असून त्याचे आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सामान्यपणे मुलीच्या लग्नाची चिंता तिच्या पालकांना नेहमीच भेडसावत असते. पण, शिर्डीतील कोते दाम्पत्याने हा प्रश्न सोपा केला आहे. कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून शिर्डीत गेली अनेकवर्षे सामुदायिक विवाह सोहोळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या या सोहळ्यात ४० हिंदू आणि २१ बौद्ध अशी ६१ जोडपी विवाहबद्ध झाली. विशेष म्हणजे अवघ्या १ रुपया नोंदणी शुल्कात होणाऱ्या या विवाह सोहोळ्याला चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे.
मिळाले २१०० मुलींची आई होण्याचे भाग्य
अनेक वर्षे सामुदायिक विवाह सोहोळ्याचे आयोजन करणाऱ्या या कैलास कोते आणि सुमित्रा कोते या दाम्पत्याला मुलगी नाही. त्यामुळेच त्यांनी या विवाह सोहोळ्याच्या माध्यमातून कन्यादान करण्याचा निश्चय केला. गेल्या २३ वर्षांपासून कोते यांच्याकडून शिर्डीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. या सोहोळ्याच्या माध्यमातून त्या कन्यादानाचे पुण्य कर्म करत आहेतच पण या माध्यमातून जवळपास २१०० मुलींची आई होण्याचा मान मिळाला आहे.
काय आहे उपक्रम?
अवघा एक रुपया शुल्क भरून या विवाह सोहळ्यात नोंदणी करता येते. कोते दाम्पत्याकडून नववधू – वराला नवीन पोशाख, सोन्याच्या मंगळसूत्राची भेट, संसार उपयोगी वस्तू, वऱ्हाडींना गोडाधोडाचे भोजन दिले जाते. विशेष म्हणजे, या सामुदायिक विवाह सोहळ्यात शिर्डीचे आमदार तथा राज्याचे विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वागतोत्सुक म्हणून जबाबदारी पार पाडतात. असे सामुदायिक विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे विखे पाटील म्हणाले.
https://twitter.com/RVikhePatil/status/1653448718266269714?s=20
Shirdi Community Wedding Ceremony Kailas Sumitra Kote Kanyadan