शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साईनगरी शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्स्पो २०२३’ ला दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देशभरातील गायी, म्हशी, अश्व, शेळी, मेंढी, कुक्कुटपक्षी यांच्या अनेकविविध जाती शेतीला पूरक पर्यायाचा शोध घेणाऱ्या शेतकरी व पशुपालकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. अत्यंत चिकित्सकपणे शेतकरी माहिती जाणून घेताना दिसले. शालेय विद्यार्थ्यांनी ही शिस्तबध्दपणे पशुधनाची माहिती जाणून घेतली.
रविवार (ता. २६ मार्च) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीपासून प्रदर्शनात सहभागी पशू-पक्षी धनांपैकी उत्तम दर्जाची पशूंची गटवाईज निवड करण्याची प्रक्रिया सुरू होती. उत्तम दर्जाच्या पशूंचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.
१२ कोटींचा हरियाणाचा ‘दाराइंद्र’ रेडा, ५१ लाखांचा घोडा, ५ लाख बोली लागलेला देशी खिलार बैल , ६ लाख किंमतीचा राहूरीचा आफ्रिकन फुलब्लड बोकडा, भारतातील सर्वात बुटकी ‘पुंगनुर’ गाय, हुशार मेंढ्या आणि तरतरीत घोडे लक्ष वेधून घेत आहेत. गायीच्या १७ जाती सहभागी झाल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने देवणी, खिलार, लालकंधार, डांगी, गवळाऊ, जर्शी, एचएफ, कोकण कपिला, गीर, साहिवाल, राठी, काँक्रीज, हरियानवी, केरळची ठेंगणी वेंचूर, पुंगानूर, ओंगल, हळीकट आदी जातींचा समावेश आहे. २० ते २२ लिटरपर्यंत दूध देणाऱ्या साहिवाल, गीर गायी सर्वांच्या आकर्षण ठरल्या आहेत. देशात प्राधान्याने गणल्या जाणाऱ्या म्हशीच्या आठ जाती प्रदर्शनात सहभागी आहेत. त्यामध्ये मुन्हा, जाफराबादी, पंढरपुरी, म्हैसाळ, नागपुरी, मराठवाडी, पुरनाथडी, नीलिरावी आदींचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल. २९ लिटरपर्यंत प्रतिदिन दूध देणाऱ्या म्हशींची जात प्रदर्शनाचे आकर्षणच आहे.
प्रदर्शनात ३२ जातींचे कुक्कुटपक्षी सहभागी झाले आहेत. त्यामध्ये वनराज, गिरिराज, कडकनाथ, न्यू हॅम्पशायर, कावेरी, गॅगस, रेड कॉर्निश, वनराज, असील, जापनीज क्वेल, आरआरआय. सातपुडा, ब्लॅक अट्रालाप, ब्रह्मा, देशी बिव्ही ३८०, ३००, जापनिज क्वेल (बटेर) आदी कुक्कुट पक्ष्याचा समावेश आहे. शेळ्या-मेंढ्याही वेधताहेत लक्ष एका वेळी एकापेक्षा जास्त करडे देण्याची क्षमता, दुधाचे ब्रीड म्हणून ओळख असलेली जमनापरी शेळी, मांस आणि काटक असलेली उस्मानाबादी, संगमनेरी, शिरोही, बेरारी, कोकण कन्याळ, बिटल, बार्बेरी, आफ्रिकन बोर, आफ्रिकन बोअर अधिक उस्मानाबादी क्रॉस, बेल्टम, तोतापुरी, सोजत, कोटा, गावठी शेळ्यांचे अस्सल वाण प्रदर्शनात आहे. अश्वाच्या विविध अस्सल जाती ही प्रदर्शनात नागरिकांची गर्दी खेचत आहेत.
पशुसंवर्धन व कृषी विभागाचे स्टॉल ही लक्ष वेधून घेत आहेत. राज्यातील ३४ जिल्ह्याचे पशुधन वैशिष्टये सांगणाऱ्या स्टॉलवरील माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. जनावरांचा चारा कुट्टी करणारे साईलेज बेलर हे मशीन पाहण्यासाठी ही गर्दी होत आहे. मृत जनावरांच्या मूळ त्वचेसह त्यांची अस्सल उभेउभे प्रतिकृती साकारणारे टॅक्सीडॅमी तंत्रज्ञानाची माहिती कोंबड्या एका प्रतिकृतीसह या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. लम्पीवरील लसीनिर्मितीची माहिती देणाऱ्या औंधच्या पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेच्या स्टॉलवर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, पशुवैद्यकीय जाणकारांची गर्दी होत आहे. ‘डॉग शो’ ही नागरिकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला. या तीन दिवसीय महापशुधन प्रदर्शनाचा उद्या, २६ मार्च रोजी शेवटचा दिवस आहे. या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घ्यावा. असे पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
Shirdi Animal Expo 12 Crore Reda 5 Lakh Bull Attraction