शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी घालण्याचे आदेश शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी जारी केले आहेत.
शिर्डी विमानतळ येथे दिवसा व रात्री वेगवेगळ्या विमान कंपन्यांची विमाने व हेलिकॉप्टर उतरत असतात आणि उड्डाण करीत असतात. रात्रीच्यावेळी वैमानिकांना दिशा आणि ठिकाण निश्चित करण्यासाठी धावपट्टीवर आणि हवाई वाहतूक नियत्रंण (एटीसी) टॉवरद्वारे लाईटचा उपयोग केला जातो. शिर्डी विमानतळ परिसरातील २५ किलोमीटर परिघात उच्च शक्तीच्या लेझरमुळे वैमानिकांचे लक्ष विचलित होणे आणि संभाव्य अक्षमतेमुळे विमानाच्या कार्यप्रणालीत गंभीर अडथळे येऊ शकतात.
सहज हाताळता येणाऱ्या (हॅंड हेल्ड लेझर) उपकरणाची कमी किंमत व बाजारातील सहज उपलब्धतेमुळे अशा घटनांची संख्या वाढून विमानाच्या महत्वाच्या टप्प्यामध्ये वैमानिक विचलीत होतात किंवा तात्पुरते अक्षम होतात. उड्डाण आणि लँडिंगच्या महत्वाच्या टप्प्यामध्ये अशा कृती विमानतळ परिसराच्या आसपास झाल्यास विमान वाहतुकीला अधिक धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा विमान वाहतूकीला अडथळा येऊ नये, कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश जारी करण्यात आले आहेत.