मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचा यंदा पहिल्यांदाच दसरा मेळावा मुंबईमधील वांद्रे – कुर्ला संकुलातील मैदानावर होणार आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधून शिंदे समर्थक आमदार आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे अनेक समर्थक कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरुन प्रवास केल्याने उद्घाटनापूर्वीच या कार्यकर्त्यांना महामार्गावरुन जाण्याची परवानगी कोणी दिली असा प्रश्न काँग्रेसचे जालना मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी उपस्थित केला आहे.
यंदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांचे वेगवेगळे दसरा मेळावे होणार आहेत. या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. जालन्यामधूनही शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिंदे समर्थक कार्यकर्ते समृद्धी महामार्गावरुन मंगळवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. खोतकर आणि त्यांचे समर्थक समृद्धी महामार्गावरुन शेकडोंच्या संख्येने गाड्यांमधून प्रवास करत असल्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.
https://twitter.com/iambadasdanve/status/1577329459212025858?s=20&t=ZrF_h-ogFJnyOvwAu6mBkg
हा व्हिडीओ ड्रोनच्या माध्यमातून शूट करण्यात आला असून व्हीडिओमध्ये समृद्धी महामार्गावर भगवे झेंडे लावलेल्या गाड्या दिसत आहेत. शक्तिप्रदर्शनच्या हेतूने जारी करण्यात आलेल्या या व्हीडिओवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. स्थानिक आमदार गोरंट्याल यांनी शिंदे समर्थकांना समृद्धी महामार्ग वापरण्याची परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
“शिंदे गटाची रॅली माझ्या घरासमोरुनच गेली. मला आमच्या अधिकृत लोकांकडून माहिती मिळाली आहे. त्यानुसार जवळपास शंभर गाड्या या रॅलीमध्ये होत्या. शिंदे गटाच्या दाव्यानुसार १५०० गाड्या होत्या. मात्र त्या दिसल्या नाहीत.” असं गोरंट्याल यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितलं. मात्र त्याचप्रमाणे त्यांनी अद्याप सामान्यांना समृद्धी महामार्ग वापरण्याची परवानगी नसल्याचा मुद्दा अधोरेखित केला.
https://twitter.com/SandeepUdmale1/status/1577538409882685442?s=20&t=ZrF_h-ogFJnyOvwAu6mBkg
“समृद्धी महामार्ग सामान्य लोकांसाठी बंद आहे. मात्र वैजापूरपर्यंत त्यांनी (शिंदे गट समर्थकांनी) समृद्धी महामार्गावरुन प्रवास केला. त्यांना कोणी परवानगी दिली? यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवेत. सरकार या लोकांवर गुन्हा दाखल करेल अशी अपेक्षा आहे. सामान्य माणूस गेला तर त्याच्याकडून दंड आकारला जातो आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. हे कोणी राजा – महाराज आहेत का? त्यांना काय सर्व माफ आहे का?” असा प्रश्न गोरंट्याल यांनी विचारला आहे.
Shinde Supporters Samruddhi Mahamarga Use Permission
Shivsena Dasara Melava