परभणी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ या काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या घोषणेचा लोकांना अद्याप विसर पडलेला नाही. नुकत्याच एका लग्न समारंभागत शिंदे गटाचे आमदार संतोषा बांगर गेले असता भर मंडपात वऱ्हाड्यांनी ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’चे नारे देत त्यांना चिडविण्याचा प्रयत्न केला.
काही महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर विरोधकांनी शिंदे गटातील आमदारांवर टीकेची झोड उठविली होती. ती अजुनही कायम आहे. मात्र, या टीका-टिप्पणीच्या खेळात ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’, ही घोषणा चांगलीच गाजली. या घोषणेने शिंदे गटातील आमदारांना अक्षरश: जेरीस आणले आहे. अशात संतोष बांगर यांना लग्नमंडपात या घोषणाबाजीचा सामना करावा लागला आहे.
परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे सोमवारी एका लग्न सोहळ्याला शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हजेरी लावली. यावेळी, लग्न मंडपात पहिल्यापासून उपस्थित असलेले परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांचे बांगर यांनी चरण स्पर्श केला. त्याचवेळी, तेथे उपस्थित काही कार्यकर्त्यांकडून पन्नास खोके एकदम ओके च्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. शेवटी आमदार बांगर निघून गेले. मात्र, ५० खोके, एकदम ओक्के म्हणत शिंदे गटाच्या आमदारांना आजही टार्गेट केले जात असल्याचे दिसून आले.
सातत्याने होतेय टीका
शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोक्यावरून सातत्याने टीका झाली आहे. विरोधकांनी दिलेली ही घोषणा आता सामान्यांमध्येही लोकप्रिय झाली आहे. त्यातल्या त्यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ५० खोके एकदम ओके आणि गद्दार म्हणत शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांवर कायमच निशाणा साधला आहे. विधानसभेच्या पायरीवरही ५० खोके, एकदम ओक्केचे बोर्ड झळकले होते. त्यामुळे, ५० खोके, एकदम ओक्के ही म्हण गावखेड्यापर्यंत पोहोचली आहे. त्यातच, सोमवारी लग्नाला गेलेल्या बांगर यांना ५० खोके, एकदम ओक्केच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागला. त्या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.
Shinde MLA Santosh Bangar Wedding Ceremony Slogans