मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेत भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली. शिंदेंच्या भूमिकेला ४० आमदार आणि १२ खासदारांनी पाठिंबा दिला. मात्र आता जे शिंदे गटात सहभागी झाले नाहीत त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी केला आहे. शिंदे गटाकडून दवाब टाकला जात असून या मानसिक तणावाला कंटाळून साडेतीन वर्षाच्या नातीसह आत्महत्या करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्ववादी विचार आम्ही पुढे घेऊन जात असल्याचे सांगत शिंदेंनी शिवसेनेवर दावा केला. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार यांनी पाठिंबा दिला. त्यासोबत पक्षातील विविध पदाधिकारी, कार्यकर्तेही शिंदे गटात सहभागी झाले. मात्र नवी मुंबईचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “गेल्या दोन महिन्यापासून शिंदे गटाकडून माझ्यावर त्यांच्यासोबत येण्यासाठी दबाव टाकला जात आहे. माझ्यावर तडीपारीची कारवाई करण्याची नोटीस देत कुटुंबापासून दूर करण्याचा डाव रचला जात आहे.
नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी मला शिंदे गटात सहभागी व्हा अन्यथा तुमचा एन्काऊंटर करु अशी धमकीदेखील दिली असून, १० लाख रुपये देण्याची मागणी केली. यामुळे माझ्यावर मानसिक दडपण आले आहे. तसेच मला व माझ्या कुटुंबाला धोका आहे. माझ्यावर खोटे आरोप आणि खोट्या केसेस करुन तडीपार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जर माझ्यावर अशी कारवाई होत असेल तर मी, माझं कुटुंब, साडे तीन वर्षांची नात, २ मुले, सुन व पत्नीसह आत्महत्या करु. आमच्या जीवाला कमी जास्त झाल्यास त्याला जबाबदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संदीप नाईक, विवेक पानसरे, विजय चौगुले हे असतील”, असा इशारा एम. के मढवी यांनी दिला आहे.
हे प्रकरण गंभीर – राजन विचारे
सत्तेचा गैरवापर करणे सध्या सुरू असल्याची प्रतिक्रिया खासदार राजन विचारे यांनी या प्रकरणात दिली आहे. गद्दार निघून गेले जे निष्ठावंत आहेत ते आमच्यासोबत राहिलेत. एम. के मढवी यांनी न ऐकल्याने पोलिसांमार्फत धमकी दिली जाते, ही गंभीर बाब आहे. एका कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ येते. याबाबत मी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोलिस आयुक्तांशी बोललो आहोत. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय, प्रत्येक शिवसैनिकाला अशाप्रकारे त्रास दिला जात आहे. हे सगळं जनता उघड्या डोळ्याने बघते आहे, असेदेखील खासदार विचारे म्हणाले आहेत.
Shinde Group Politics Encounter Threat Police