जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटातील नेते व उद्धव ठाकरे गटातील नेते यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमकी रंगताना दिसत आहे. नुकतीच पाचोरा शहरातील शिवसेना कार्यालयात तालुका प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या शिवसेना कार्यालयावर आमदार किशोर पाटील यांच्या नावाचा फलक लावण्यात आला होता. हा फलक पाटील यांची बहिण वैशाली सूर्यवंशी यांनी काढून टाकला. सूर्यवंशी या ठाकरे गटातील आहेत. तसेच त्यांनी शिवसेना कार्यालयावरही ताबा मिळविला आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा ९ ऑगस्टपासून जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यातून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा फलक सूर्यवंशी यांनी काढून टाकला. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर माझी निष्ठा आहे. माझे वडिल स्व. तात्यासाहेब आर ओ. पाटील यांनी दाखवलेल्या मार्गावर मी चालत आहे. मी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. कितीही अडचणी आल्या तरी ही निष्ठा कमी होणार नाही. पक्षाकडून माझ्यावर जी काही जबाबदारी दिली जाईल ती मी स्वीकारेल.”
वैशाली सूर्यवंशी यांनी जाहीरपणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ९ ऑगस्ट रोजी आदित्य ठाकरेंचे स्वागत करण्यासाठी जल्लोषात तयारीदेखील सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना संपर्क कार्यालय त्यांनी ताब्यात घेतले आहे. हे कार्यालय जिथे आहे ते ठिकाण वैशाली यांचे खासगी मालमत्ता आहे. या कार्यालयावरच आमदार किशोर पाटील यांचे बॅनर लावण्यात आले होते. ते त्यांनी काढून टाकले आहे. त्यामुळे बहिण – भावाच्या राजकीय विरोधाची चर्चा सध्या तिथे रंगली आहे.
Shinde Group Pachora MLA Kishor Patil Sister Vaishali Suryawanshi
Shivsena Politics Jalgaon District