मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. कारण, शिवसेनेने शिंदे गटाच्या आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यातच आता बहुमत चाचणीवरुन शिंदे गटाने शिवसेनेच्या १४ आमदारांना निलंबनाची नोटिस बजावली आहे. विशेष म्हणजे, शिंदे यांच्या विरोधात मतदान करणारे आमदार आदित्य ठाकरे यांना मात्र वगळण्यात आले आहे. त्यामुळे याविषयी सध्या विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत.
शिवसेनेच्या १५ आमदारांनी बहुमताच्या चाचणीच्या वेळी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने मतदान केले नाही. या आमदारांमध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे. मात्र शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केलेल्या तक्रारीमध्ये आदित्य यांचे नाव वगळण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आल्याचे गोगावले यांनी सांगितले आहे.
बहुमत चाचणीमध्ये एकनाथ शिंदे यांना १६४ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात ९९ मते पडली. व्हीपचे पालन न केल्याने शिवसेनेच्या या १४ आमदारांना नोटीस देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील लढाई आता कायदेशीर मार्गावर पोहोचली आहे. आदित्य ठाकरे यांना निलंबनाची नोटीस का पाठवण्यात आलेली नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिंदे गटाचे शिवसेना प्रमुखांवर प्रेम व आदर आहे म्हणून त्यांनी आदित्य यांना नोटीस बजावली नसल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी म्हटले, की, आम्ही आदित्य ठाकरे यांना नोटीस पाठवलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर करतो. याच कारणामुळे आम्ही आदित्य ठाकरे यांना नोटीस पाठवलेली नाही.
We have given notices to disqualify all the MLAs who defied our whip; have not given his (Aaditya Thackeray's) name due to our respect for Balasaheb Thackeray: Shiv Sena chief whip Bharat Gogawale pic.twitter.com/hRQZsqZ7Lj
— ANI (@ANI) July 4, 2022
दरम्यान, पक्षादेश डावलून पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या १४ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे. त्याची तपासणी करून संबंधितांना नोटीस बजावण्याबाबत अध्यक्ष निर्णय घेणार आहेत.
शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनीही आमदारांसाठी व्हिप जारी केला होता. त्यानुसार सेनेच्या १५ आमदारांनी तो पाळला. तर, बंडखोर शिंदे गटानी तो पाळला नाही. परिणामी, प्रभू यांनीही विधानसभा अध्यक्षांकडे याप्रकरणी तक्रार केली आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता दिली आहे. परिणामी, गोगावले यांची तक्रार अध्यक्षांकडून स्विकारली जाणे स्वाभाविक आहे. मात्र, याप्रकरणी भेदभाव होत असल्याने आम्ही कायदेशीर लढाई लढणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले आहे.
Shinde Group notice to Shivsena 14 MLA without Aditya Thackeray Shivsena Vs Eknath Shinde