नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लवकरच होणाऱ्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता शिंदे गटानेही तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेचे माजी नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांची नाशिक महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तिदमे हे सिडको परिसराचे रहिवासी आहेत. विशेष म्हणजे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे सुद्धा सिडकोतीलच आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला शह देण्यासाठी सिडकोतील नेत्यालाच महानगर प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी निवडणूक तिदमे यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये लढविली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तिदमे हे गेल्या निवडणुकीत म्हणजे २०१७ मध्ये प्रथमच नगरसेवक झाले आहेत. शिवाय ते शिवसेनेच्या म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष होते. आता त्यांनी ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. आणि त्यातच त्यांना महानगर प्रमुखपदाची बक्षिसी देण्यात आली आहे. शिंदे गटाने तरुण नेत्याला संधी देऊन एक चाल टाकली आहे. आता ठाकरे गटाकडूनही नाशिकमध्ये निवडणुकीसंदर्भात विविध नियुक्त्या आणि घोषणा होण्याची चिन्हे आहेत.
ग्रामीणच्याही नियुक्त्या
शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या नाशिक ग्रामिण जिल्हा प्रमुखपदी अनिल ढिकले तर दिंडोरी ग्रामीणच्या जिल्हाप्रमुखपदी भाऊलाल तांबडे यांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नियुक्ती केली आहे. खा.हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत ना.एकनाथ शिंदे यांनी अनिल ढिकले आणि भाऊलाल तांबडे यांना नियुक्तीपत्र देवून त्यांना सन्मानित केले. जनसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आपल्या पक्षाची शाखा गावागावात उघडा अशा सूचना वजा आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. येत्या काही काळात निश्चितच गाव तिथे आपल्या पक्षाची शाखा दिसेल अशी ग्वाही यावेळी खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली आहे.
गेल्या महिन्याभरात खासदार हेमंत गोडसे यांच्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सहभागी होण्यासाठी जिल्हातील विविध पक्षांचे पदाधिकारी इच्छुक असून पक्षाच्या कामाला गती देण्यासाठी आणि जनसामान्यांची कामे मार्गी लावण्याकामी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्याचे काम सुरू झाले आहे.पक्षाचे जिल्हाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते याकडे गेल्या काही दिवसांपासून जिल्हावासियांचे लक्ष लागून होते.
खा.हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने आज नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुखपदी अनिल ढिकले यांची तर दिंडोरी ग्रामिणच्या जिल्हाध्यक्षपदी भाऊलाल तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अनिल ढिकले यांच्याकडे नाशिक लोकसभा मतदारसंघातील देवळाली, इगतपुरी आणि सिन्नर या विधानसभा मतदारसंघाचे जबाबदारी असणार असून भाऊलाल तांबडे यांच्याकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सुरगाणा – कळवण, दिंडोरी -पेठ आणि निफाड या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.भाऊलाल तांबडे आणि अनिल ढिकले या दोघांनाही आज मुंबई येथील वर्षा बंगल्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
अनिल ढिकले यांनी शिवसेनेच्या उप जिल्हाप्रमुखपदी काम केलेले असून ते नाशिक पंचायत समितीचे माजी सभापती आहेत.भाऊलाल तांबडे यांचा शाखाप्रमुख ते दिंडोरी जिल्हाप्रमुख असा प्रवास आहे.जनसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी गाव तिथे शाखा असणे गरजेचे असून त्यासाठी जोमाने कामाला लागा अशा सूचना वजा आवाहन यावेळी ना.शिंदे यांनी केले.या बरोबरच नासिक ग्रामीण पूर्व तालुकाप्रमुखपदी सुभाष शिंदे यांची तर नासिक ग्रामीण पश्चिम तालुकाप्रमुखपदी विलासराजे सांडखोरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अनिल ढिकले आणि भाऊलाल तांबडे यांची नासिक आणि दिंडोरी ग्रामीणच्या जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याने पक्षाचे सचिव संजय मोरे, नामदार दादा भुसे,आमदार सुहास कांदे,संजय बच्छाव,योगेश म्हस्के, लक्ष्मीबाई ताठे,शिवाजी भोर,मामा ठाकरे, सचिन पाटील आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.
Shinde Group Nashik City Chief Declare Today
Politics Shivsena Rebel Appointments
Pravin Tidme