नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे आज नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे यांनी आज हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला. यावर शिंदे म्हणाले की, आज अधिवेशनात बोलणारे अडीच तीन वर्षात पहिल्यांदाच नागपूरला आले असतील. सीमावादावर सरकार गंभीर आहे. त्यामुळे त्यांनी फार काळजी करु नये, असा टोला त्यांनी हाणला.
डॉ. शिंदे ठाकरेंवर टीका करताना पुढे म्हणाले की, चार भिंतीच्या आत बसलो, घरात बसलं तर लोकांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना कशा कळणार? लोकांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी ग्राउंड लेव्हलवर काम करावं लागतं. लोकांमध्ये मिसळाव लागतं, कार्यर्त्यांना जपावं लागतं. आतापर्यंत अनेक सत्तांतर झाली पण हे सत्तांतर ऐतिहासिक होतं. ५० आमदार आणि १३ खासदार का गेले. आत्मपरीक्षण करायला हवं, लोकं का चालले आहेत. काय चुकतंय हे तपासायला हवं. हे डबल इंजिन सरकारचं आहे, चांगलं काम करतंय, राज्याच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा केंद्राची मदत लागेल तेव्हा केंद्राकडून मदत घेण्याचं काम मोठ्या मनाने हे सरकार करेल. तुम्ही अडीच वर्षे घरी बसून काम केलं, राज्याला मागे नेलं, असेही ते ठाकरेंना म्हणाले.
सत्तारांचा राजीनामा
महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधिमंडळ अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याबद्दल डॉ. शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, विरोधकांकडे काही प्रश्नच उरलेले नाहीत. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून लोकहिताचे अनेक निर्णय घेतले जाताय. बाळासाहेबांच्या शिवसेनेत येण्याचा लोकांचा ओढा वाढत चालला आहे. येणाऱ्या काळात अनेक जण येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे विरोधकांकडे प्रश्नच उरलेले नसल्याने काहीतरी मुद्दे काढायचे, अभ्यास करायचा नाही. फक्त बेछूट आरोप करत सुटायचे इतकेच त्यांचे काम आहे. आरोप करण्यापलीकडे विरोधकांकडे काहीच काम नाहीय, असे ते म्हणाले.
संजय राऊतांवर टीका
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही डॉ. शिंदे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राऊतां बरोबर लोक होते, तेव्हा चांगले होते आणि आता सोडून गेल्यानंतर ते त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न करताय. तुमचं नेतृत्व त्यांना मान्य नाही. तुम्ही रोज मनोरंजन नाही तर लोकांची सकाळ खराब करतायत. तुमची सकाळ खराब आहे, पण लोकांची पण सकाळ खराब करतायत. लोकांना हे चालणार नाही, लोकांना विकास हवा. तो विकास आमचं सरकार करतंय, असे त्यांनी ठासून सांगितले.
सीमावादावर म्हणाले…
सीमावाद प्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समिती आज आंदोलन करीत आहे. त्यावर डॉ. शिंदे म्हणाले की, सीमावादावर बेळगावमध्ये जेव्हा आंदोलन झालं, तेव्हा एकनाथ शिंदे साहेब स्वतः जेलमध्ये होते. त्याची तीव्रता त्यांना जास्त माहित आहे. सरकार एकीकरण समिती सोबत आहे. योग्य ती पावले नक्कीच उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Shinde Group MP Dr Shrikant Shinde on Uddhav Thackeray
Politics Balasahebanchi Shivsena Nashik