मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटातील आमदारांनी आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी आदित्य यांच्या विरोधात आज जोरदार घोषणाबाजी केली आणि विधीमंडळाबाहेर ‘परमपूज्य युवराज’ असे पोस्टरही दाखवले. याशिवाय आदित्य यांच्या एका ‘शब्दा’वरूनही विधानसभेत बराच गदारोळ झाला. विशेष म्हणजे शिवसेनेत बंडखोरी करणारे आमदार ठाकरे कुटुंबाला टार्गेट करणार नसल्याचे सातत्याने सांगत होते. आता मात्र त्यांनी आदित्ययांना टार्गेट केले आहे. आदित्य यांच्या राज्यभरातील दौऱ्याला मोठा प्रतिसाद लाभत असल्यानेच त्यांना टार्गेट केले जात असल्याची टीका केली जात आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार आदित्यविरोधात पोस्टर घेऊन उतरले. या पोस्टरमध्ये माजी मंत्री व आदित्य ठाकरे हे घोड्यावर उलटे बसलेले दाखवले आहेत. यातून घोडा हिंदुत्वाकडे बघत असल्याचं दाखवलं जात आहे, पण आदित्य यांचा चेहरा महाविकास आघाडीकडे आहे. तसेच पोस्टरवर ‘महाराष्ट्राचे परमपूज्य (पु) युवराज’ असे लिहिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील आमदारांकडून ५० खोके… माजले बोके.. यासह विविध प्रकारची टीका केली जात आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली जात आहेत. तसेच, आदित्य यांच्याकडून शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख वारंवार गद्दार असा केला जात आहे. ही टीका अत्यंत जिव्हारी लागल्यानेच शिंदे गटातील आमदारांनी आता आदित्य यांना लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे.
Shinde Group MLA Target Aditya Thackeray
Shivsena Rebel Yuva Sena Politics