मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवराळ भाषा, धमक्या आणि दमदाटी यामुळे वादग्रस्त ठरलेले मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामधील कळमनुरीचे (शिंदे गटाचे ) आमदार संतोष बांगर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आमदार बांगर मंत्रालयात जात असताना त्यांच्यासोबत सुमारे कार्यकर्ते देखील होते. मात्र त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबलने कार्यकर्त्यांना अडवून त्यांना पास काढण्यास सांगितले. यावर बांगर संतापले आणि त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली तसेच माझ्याकडे पिस्तुल असते तर, तुला तर गोळ्या घातल्या असत्या, तु मला ओळखले नाही का ? असा दम दिला. यासंदर्भात पोलीस कॉन्स्टेबलने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली. परंतु बांगर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
पोलीस बांधवांशी मी कुठल्याही प्रकारचा वाद किंवा हुज्जत घातलेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. काही कामानिमित्त हिंगोली जिल्ह्यातून औरंगाबाद मार्गे मुंबईत येऊन मंत्रालयात जात असताना पोलिसांनी थांबवले आणि रजिस्टरमध्ये नोंद करण्यास सांगितले. त्यावर बांगर यांनी कार्यकर्त्यांनाही मनाई केली, ते नियमभंग करीत थेट घुसले, असे म्हटले जाते. तसेच तुम्ही मला ओळखले नाही का? मी आमदार आहे, असे पोलिसांना सांगितले.
पोलीस हे सकाळपासून ड्युटी करत असतात. आपण त्यांचा आदर करतो. पण मला मुख्यमंत्री साहेबांनी कुठलीही समज दिलेली नाही. तसेच या प्रकरणी सीसीटीव्ही तपासून घ्या आणि जे काही तथ्य आहे ते समोर येईल, असे म्हणत या प्रकरणी आमदार बांगर यांनी सरावासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. बांगर म्हणाले की, मी काही कार्यकर्त्यां सोबत मंत्रालयात जात असताना तेथील पोलीस कर्मचाऱ्याने डायरीत प्रवेशाची नोंद करण्यास सांगितले. यावेळी एका कार्यकर्त्याने सोबत आमदार असल्याचे सांगितले. त्या कर्मचाऱ्याने मला ओळखलं नव्हते. मात्र मी ओळखल्यानंतर सन्मानाने मला आत पाठवले. याबाबत माझ्या पीएने नंतर डायरीत नोंद केली. आम्ही कोणतीही हुज्जत घातली नाही. असा दावा देखील त्यांनी केला.
मात्र दुसरीकडे मंत्रालय सुरक्षेवर असलेल्या पोलिस शिपायाला धमकी दिल्या प्रकरणाचा अहवाल गृह खात्याच्या वरिष्ठांना पाठवण्यात आल्याने बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांगर यांची वर्षा निवासस्थानी चांगली समज दिल्याचे सांगण्यात येते. पण मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कुठलीही समज दिली नाही, असे बांगर यांचे म्हणणे आहे. याबाबत संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने मंत्रालय पोलिस नियंत्रण कक्षाच्या दैनंदिन डायरीमध्ये याबाबत रात्री नोंद केली. या नोंदीचे पडसाद दिवसभर मंत्रालयात उमटले. बांगर यांनी सरकारी अधिकाऱ्यांना यापूर्वी अनेकदा दमदाटीचे प्रकार केले आहेत.
Shinde Group MLA Santosh Bangar Police Curse
Behavior Mantralay