छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मंत्री फौजिया खान यांच्या घरी चोरी होऊन एक वर्षही उलटले नसेल तर दुसऱ्या एका बड्या नेत्याची कार चोरीला गेल्याची घटना पुढे आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे नेत्यांच्या घरावर डल्ला मारण्याची चोरांची मालिका अद्याप संपलेली नाही. त्यामुळे या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये माजी मंत्री फौजिया खान यांच्या घरी रात्री दहाच्या सुमारास चोर शिरले होते. त्यांनी मागच्या दाराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला आणि चोरी करून पसार झाले. त्यानंतर आता सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर चोरांची नजर पडली. त्यांच्या घराच्या बाहेर उभी असलेली ट्रॅक्टर ट्रॉली चोरांनी पळवून नेली आहे. पाच लाख रुपये किंमतीची ही ट्रॉली त्यांच्या मुलीच्या नावावर आहे. शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत याच्या तक्रारीवरून येथील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे एकूणच जिल्ह्यामध्ये सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध देखील घेतला जात आहे. मात्र चोरांनी थेट आमदार शिरसाट यांचाच ट्रॅक्टर चोरी केल्याने खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर सर्वसामन्य लोकांनी कुणाकडे बघावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर आमदार शिरसाट यांचा ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर देखील आव्हान असणार आहे.
शिरसाट पुन्हा चर्चेत
शिंदे गटाने उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपसोबत हात मिळवला. तेव्हापासनं कुठल्या ना कुठल्या विधानामुळे किंवा भूमिकेमुळे संजय शिरसाट चर्चेत असतात. पण यावेळी त्यांची चर्चा वेगळ्याच कारणाने होत आहे. आणि ते कारण चोरीचे आहे. खुद्द शिरसाट यांच्या घरी चोरी झाल्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे.
Shinde Group MLA Sanjay Shirsat Tractor Theft