मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुठल्याही सरकारमध्ये मंत्रीमंडळ एकदा निश्चित झाले की, नाराजांची संख्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या संख्येपेक्षा तिप्पट असते. कारण प्रत्येकाला अपेक्षा असते. अशीच अपेक्षा शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले तेव्हा अनेकांनी केली, पण आता सारे मंत्रीमंडळ विस्ताराकडे लक्ष लावून आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारला आता एक वर्ष व्हायला आलं, पण मंत्रीमंडळ विस्ताराचा फुगा काही फुटायला तयार नाही. गेल्या दहा महिन्यांपासून सातत्याने लवकर विस्तार होईल, एवढेच सांगितले जाते. त्यात अनेक नाराजांनी धमकीवजा इशाराही दिला. नंतर ते शांत झाले. पुन्हा मध्येच कधीतरी माध्यमांनी विचारले म्हणून भावनांना वाट मोकळी करून द्यायला लागले. पण कुणीही पक्ष सोडून गेलेला नाही. या विस्तारामध्ये विशेषतः एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाविकास आघाडीतून बंडखोरी करून बाहेर पडलेल्यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षभरापासून एक नाव तर सातत्याने चर्चेत राहिले आहे ते म्हणजे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांचे. त्यांनी सातत्याने आपल्याच सरकारला मंत्रीमंडळ विस्ताराबाबत प्रश्न केले. असे अनेक नाराज असतील. त्यात शिंदे गटातील प्रमुख नेते आमदार संजय शिरसाट यांचाही समावेश आहे की काय, अशी शंका उपस्थित करणारे विधान त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना सुद्धा दहा महिन्यांपूर्वी मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे तेही मंत्रीमंडळ विस्ताराची प्रतिक्षा करीत बसले आहेत.
नाराजी असणारच
संजय शिरसाट यांनी मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून नाराज होतो, असे म्हटले आहे. ‘नाराजी असणारच. कधीही मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना प्रत्येकाला स्थान मिळत नाही. गेल्या मंत्रिमंडळात मला स्थान मिळाले नाही, तेव्हा मी नाराज होतो. पण अशी नाराजी असतेच. सगळ्यांनाच मंत्री करता येत नाही. सगळेजण मुख्यमंत्री होत नाही किंवा सगळेच जण उपमुख्यमंत्री होत नाहीत,’ असे ते म्हणाले आहेत.
मातोश्रीवर काय उरले आहे?
विस्तारातही मंत्रीपद मिळाले नाही तर उद्धव ठाकरे यांच्या गटात सामील होणार का, असा सवाल त्यांना करण्यात आला होता. त्यावर मंत्रीपद मिळाले नाही तरीही तिकडची वाट धरणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘मातोश्रीवर काय आहे? तिथे उरलेच काय? उलट तिकडे जे १५ आमदार आहेत, ते शिंदे साहेब त्यांना बोलावण्याची वाट बघत आहेत. मंत्रीपद मिळो न मिळो आम्ही सगळे शिंदे साहेबांबरोबर आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Shinde Group MLA Sanjay Shirsat on Cabinet Expansion