मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सुमारे पंचवीस तीस वर्षांपूर्वी आपल्या प्रचार सभांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता, त्यावेळी विदर्भ आणि मराठवाडा या भागात असलेला बंजारा समाज हा शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला होता, तेव्हापासून अनेक निवडणुकांमध्ये बंजारा समाजाने शिवसेनेला साथ दिली आहे, त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी हा समाज उभा राहिला होता. मात्र कालांतराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्या बंडामध्ये संजय राठोड सहभागी झाले आहेत. संजय राठोड हे बंजारा समाजातील मोठे नेते आहेत. त्यांच्यामुळे बंजारा समाज शिवसेनेसोबत होता. त्या समाजाचा पाठिंबा शिवसेनेला कायम राहावा, यासाठी उद्धव ठाकरे यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या माध्यमातून शिवसेनेसोबत असलेल्या इतर बंजारा समाजातील नेत्यांच्या भेटीगाठी उद्धव ठाकरे घेत आहेत.
बंजारा समाज मुख्यत्वे वायव्य, पश्चिम आणि दक्षिण भारतात जास्त आढळतो. बंजारा, गोर, लंबाणी, लामण अशा पोटजाती या समाजामध्ये आहेत किंवा अशा वेगवेगळ्या नावाने हा समाज ओळखला जातो. तर राठोड, नाईक, पवार, जाधव, तवर, चव्हाण, आडे अशी आडनावे या समाजामध्ये आढळतात. मराठवाडा आणि विदर्भातल्या बंजारा समाजांच्या वस्त्यांवर सेवालाल महाराजांचा झेंडाही फडकताना दिसतो. १७ व्या शतकात होऊन गेलेल्या सेवालाल महाराज यांच्याकडे समाजसुधारक म्हणूनही पाहिले जाते.
बंजारा समाजाचे नेते राजू नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत उद्धव ठाकरे यांची शिवसेनाभवन येथे भेट घेतली. समस्त बंजारा समाज आजही शिवसेनेसोबत आहे, असे आश्वासन नाईक यांनी यावेळी दिले. तसेच पोहरादेवीच्या दर्शनाला येण्याचा उद्धव ठाकरे यांना आग्रह केला. बंजारा समाजासाठी पोहरादेवी हे धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून संजय राठोड यांची कोंडी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना वनमंत्री पद देण्यात आले. मात्र, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांना मंत्रीपद सोडावे लागले. यानंतर ते बंडखोर एकनाथ शिंदे गटात सामिल झाले. त्यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मंत्रीपद देण्यात आले आहे. आता शिंदे गटातील मंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना जबरदस्त झटका बसणार आहे. नेहमीही पाठीशी उभा राहणारा बंजारा समाज संजय राठोडांची साथ सोडणार आहे.
निम्म्यापेक्षा जास्त बंजारा समाज उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणार आहे. समाजाच्या बांधवांनी संजय राठोड यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बंजारा समाजाने शिवबंधन बांधून घेण्याचा निर्णय घेतला आहे. बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलने केली होती तेच आता भाजपसोबत मंत्री आहेत. त्यामुळे, भाजपची चागंलीच कोंडी होत आहे. कारण पूजाच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार आहेत असा थेट आरोप करत भाजपच्या महिला आघाडीने कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर राज्यभरात आंदोलनही करण्यात आले. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संजय राठोड यांना अखेर पायउतार व्हावे लागले होते.
भाजपच्या चित्रा वाघ आणि इतर नेत्यांनी आमदार संजय राठोड यांच्यावर गलिच्छ आरोप करुन त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्ही बंजारा समाजबांधव संजय राठोड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतो. पण आज त्याच भाजपच्या इशार्यावर त्यांनी शिवसेनेला सोडून जाण्याची भूमिका घेतल्यामुळे तमाम बंजारा समाजबांधवांमध्ये असंतोष पसरला आहे. म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमदार संजय राठोड यांनी शिवसेनेत परत यावे असे सांगितले पण ते शिवसेनेत परत आले नाहीत म्हणूनच आम्ही आता शिवसेना सोबत जात असून उद्धव ठाकरे यांची सोबत करणार आहोत, असेही बंजारा समाजातील अनेक नेत्यांनी सांगितले आहे.
दोन ते तीन दिवसात बंजारा समाजाचे कार्यकर्ते मातोश्रीवर जाऊन शिवबंधन हातावर बांधणार आहेत. हे सर्व उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत शिवसेनेचा भगवा हातात घेणार आहेत. बंजारा समाजाने शिवसेनेत प्रवेश केल्यास संजय राठोड यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. यामुळे संजय राठोड यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. संजय राठोड याचे बंजारा समाजात विशेष स्थान आहे. शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती.
Shinde Group Minister Sanjay Rathod Trouble
Politics