जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विविध प्रकारच्या वक्तव्यांमुळे आणि जीभ घसरल्यामुळे ते सतत चर्चेत असतात. आता त्यांनी उद्धव टाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्याबद्दल त्यांच्याविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली जात आहे.
सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभ्यासू वक्त्या सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात सामील झाल्या असून त्यांना उपनेते पदाचा दर्जा देण्यात आला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शाब्दिक चकमक घडत आहेत. त्यातच गुलाबराव पाटील यांनी कोणतीही भिडभाड न ठेवता आपल्या भाषणात सुषमा अंधारे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्याने महिलावर्ग मध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे तसेच याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांची गुलाबराव पाटलांच्या जिल्ह्यात सभा आयोजित केली होती. परंतु पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. यामुळे सुषमा अंधारेंनी ऑनलाईन पद्धतीने सभा घेत गुलाबराव पाटलांवर जोरदार टीका केली. गुलाबराव पाटील दबावतंत्राचा वापर करून आपली सभा रोखू इच्छित आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
अंधारे यांच्या आरोपानंतर गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुषमा अंधारेंवर टीकास्र सोडताना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली आहे. त्यांनी सुषमा अंधारेंचा ‘नटी’ असा उल्लेख जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. काही दिवसांपासून उध्दव ठाकरे गटाच्या वतीने सुषमा अंधारे यांच्या महप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात ही यात्रा जळगाव जिल्ह्यात पोहचली होती, सुषमा अंधारे यांची पहिलीच सभा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील खुद्द पाटील यांच्या धरणगावात पार पडली. या सभेला मात्र पोलिसांनी परवानगी दिली होती. यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी हजेरी लावली. देवकर हे मंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात.
आपला कट्टर विरोधक अंधारे यांच्या व्यासपीठावर गेल्याने पाटलांना राग आला असावा, त्यातून ते बेताल वक्तव्य करीत आहेत असे म्हटले जाते. सुषमा अंधारे आणि गुलाबराव पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. पाटील यांनी शिंदे गटातील मंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांचा पक्ष बुडवणार अशी टीका केली होती. अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा ही सध्या जळगाव येथे आल्यावर गुलाबरावांमुळेच सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली, अशी टीका केली होती. त्यानंतर पुन्हा पाटील यांनी सुषमा अंधारेंना राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्यासाठी पाठवलं आहे असा यांनी केला. ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेबद्दल बोलताना ते म्हणाले की, अशा लोकांची महाप्रबोधन यात्रा नसून, मात्र हे जे नवीन प्रॉडक्ट आणले ते राष्ट्रवादीचे आहे. त्याचप्रमाणे उरल्या-सुरलेल्या शिवसेने नुकसान करण्यासाठी हे नवीन पार्सल राष्ट्रवादीकडून इकडे आलेले आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
इतकेच नव्हे तर मंत्री गुलाबराव म्हणाले की, या बाईने ज्या देवतांना शिव्या घातल्या. बाळासाहेबांच्या वर तसेच उद्धव ठाकरे यांच्या विषयी अशी वाईट विधाने केली होती, अशी बाई त्यांना कशी चालते? यापेक्षा आणखी घाण काय असू शकते? अशी कठोर टीका गुलाबराव यांनी केली. यावेळी ते पुढे म्हणाले, सुषमा अंधारेंना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा पिक्चर (चित्रपट) कुठेच चालला नाही, त्यामुळे त्या शिवसेनेत आल्या. ठाकरे गटालाही नटीची गरज होती.
ज्याप्रमाणे एखादा पिक्चर काढण्यासाठी अभिनेत्रीची गरज असते, त्याप्रमाणे यांनाही (ठाकरे गटाला) एखादी बाई पाहिजे होती. त्यामुळे त्यांनी आपल्या पिक्चरमध्ये या बाईला आणले. ती एक बाई आहे, माणूस असते तर गुलाबराव कोण आहे, हे दाखवलं असते, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी टीकास्र सोडले आहे. उरलेली सोडलेली शिवसेना डॅमेज करण्यासाठी राष्ट्रवादीकडून सुषमा अंधारे हे पार्सल इकडे आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या या पार्सल पासून सावध रहावे. राष्ट्रवादीचे हे पार्सल तुमच्या पक्षाला डब्यात नेल्याशिवाय राहणार नाही, अशी कठोर टीकाही पाटील यांनी केली आहे.
Shinde Group Minister Gulabrao Patil Controversial Statement
Sushma Andhare Politics