नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्या जाणाऱ्या संभाव्य निकालाबाबत पहिल्यांदाच शिदे गटाच्या मंत्र्याकडून मोठे भाष्य करण्यात आले आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी आज नाशिक विभागीय महसूल आयुक्तालयात विभागीय खरीप आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सर्वोच्च न्यायालयाकडून १६ आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत निकाल दिला जाण्याविषयी चर्चा होत आहे. याविषयी मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले की, आता आमचे कॅप्टनच (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) गेले तर बाकी काही बघण्याचा प्रश्नच नसतो. त्या
१६ आमदारांमध्ये मी देखील आहे. राजकारणात प्लॅन A आणि प्लॅन B असतो. प्लॅन प्रमाणेच घडते असे काही नाही. आम्ही गेलो तरी इतिहास राहणार, आम्ही राहिलो तरी इतिहास राहणार. आमचे पन्ने नाही इतिहासात लिहिले जाणार. हा निर्णय देशासाठी लागू होईल. सुप्रीम कोर्टाचा निकाल जो काही येईल तो आम्ही हसता खेळता मान्य करू, असे सत्तार यांनी स्पष्ट केले.
सत्तार पुढे म्हणाले की, मला काही निकालाची धास्ती नाही. आपली लोकल गाडी. हात दाखवा, गाडी थांबवा. मी कुत्रा या निशाणीवर लढलो तरी सत्तार आमदार पक्का आहे, असा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार भाजपसोबत आघाडी करणार असल्याची चर्चा आहे. त्यावर सत्तार म्हणाले की, आमचा सर्वांचा विश्वास एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे एकदाच मंत्रालयात
मंत्री सत्तार म्हणाले की, शिवसेना आता आमची आहे. त्यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे. शरद पवार हे एकाच तिरात अनेक पक्षी मारतात. पवारांनी भाकरी फिरवण्याऐवजी तवाच पलटी मारला. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीतील नवीन पिढी घडावी असं त्यांना वाटलं असावं. माझ्या अडीच वर्षाच्या कालावधीत उद्धव ठाकरे हे एकदाच मंत्रालयात गेले असावेत. पवारांनी दोनदा लिहिलं असेल तर माहित नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे एकदाच ते गेले, असा दावा सत्तार यांनी केला.
संजय राऊतांवर आगपाखड
मंत्री सत्तार यांनी यावेळी खासदार संजय राऊत यांच्यावर आगपाखड केली. ते म्हणाले की, शरद पवार म्हणतात शिवसेनेची झाली ती परिस्थिती झाली नसती, ठाकरे गट म्हणतात राष्ट्रवादीची जी परिस्थिती झाली ती झाली नसती. वज्रमुठ मधली एक मूठ गेली नंतर दुसरी जाणार. तिसरी जागेवरच राहणार. सकाळचा भोंगा (संजय राऊत) वज्रमूठ तोडण्याचं काम करतोय. आमच्या मतावर खासदार झाले ते विसरले. माझं मत त्यांना दिलं आणि आता तेच आम्हाला शिव्या देतात. वज्रमुठ तुटण्याचं कारण सकाळचा भोंगाच आहे. रोज सकाळी सात-आठ वाजता तुमच्यासमोर वाजतो आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रावर होतात, अशी टीका सत्तार यांनी केली.
Shinde Group Minister Abdul Sattar on Supreme Court Hearing