मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप करुन त्यांचा राजीनामा मागण्यात आला. त्यानंतर आता सत्तार यांनी केलेल्या मोठ्या गौप्यस्फोटामुळे शिंदे गटात पहिली ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. कारण, सत्तार म्हणाले की, माझ्यावर झालेले आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत. माझ्याच पक्षातील काही व्यक्ती यासंदर्भात माहिती पुरवित आहेत, असा आरोप सत्तार यांनी केला आहे.
अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात. तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणीतरी बाहेर बातम्या पुरवत आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सत्तार पुढे म्हणाले की, माझ्यावर झालेल्या सर्व आरोपांचे खुलासे मी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केले आहेत. मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोप माझ्यावर करण्यात आले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्या पक्षातील देखील काही व्यक्तींचा यात सहभाग असू शकतो. तर विरोधी पक्षात देखील माझे अनेक हितचिंतक आहेत. माझ्यासारखा अल्पसंख्याक व्यक्ती कृषिमंत्री पदावर बसल्याने अनेकांना पाहिले जात नाही. त्यामुळे सतत माझ्याविरोधात कट कारस्थान रचले जात असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
सत्तार पुढे म्हणाले की, सध्या आमच्या पक्षात ज्या काही बैठका होत आहेत. त्या बैठकीतील झालेल्या चर्चेच्या बातम्या बाहेर येत आहेत. मागील काही दिवसापूर्वी आमची मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत एक बैठक झाली होती. त्या बैठकीत चर्चा अत्यंत गुप्त होती. मात्र, बैठकीत काय झाले हे नंतर बाहेर आले. विशेष म्हणजे ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या देखील बाहेर सांगण्यात आल्या. त्यामुळे आपल्यातील कुणीतरी आपल्यातील खासगी गोष्टी बाहेर पुरवत असल्याचे मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले आहे. मी कुणाचे नाव घेणार नाही, पण मुख्यमंत्र्यांनी यांची चौकशी करावी असेही त्यांनी म्हटले आहे.
गायरान जमिनीप्रकरणी बोलताना सत्तार म्हणाले की, त्या संबंधित परिवारांना भेटून खरी गोष्ट पुढे आणा, त्यांच्या जमिनीची नोंद असल्यावर कोर्टानेही त्यांच्याकडे राहू देण्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार काम केले आहे. विरोधी पक्षातील काहींनी कारखानदारी आणि संस्थेसाठी कोट्यावधीचा जमिनी लुटल्या. माझ्यावर कृषी प्रदर्शनाबाबत आरोप करता? मग बारामतीच्या कार्यक्रमांना पैसा कुठून येतो, असा सवाल अब्दुल सत्तार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
Shinde Group Minister Abdul Sattar on Conspiracy Politics
Internal