मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
असे म्हणतात की, युद्धात आणि राजकारणात कुणीही कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात देखील असे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. एकेकाळी शिवसेना-भाजपची खूप वर्ष युती होती, परंतु विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या युतीला सुरंग लागून महाविकास आघाडी स्थापन झाली, आणि शिवसेनेचे एकेकाळचे कट्टर शत्रू म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस केवळ मित्र बनले असे नव्हे, तर सत्तेमधील सहकारी देखील बनले. आताही शिंदे गट आणि भाजप एकत्र आले आहेत. मात्र, भाजपने आखलेल्या रणनितीमध्ये शिंदे गटही त्यांच्या निशाण्यावर आहे.
शिंदे गटाला जोरदार धक्का देण्याची जणू काही तयारी भाजपने केली आहे असे दिसून येते, कारण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निश्चित केले असून, त्यासाठी आगामी १८ महिन्यांत एक मिशन राबविले जाणार आहे. शिवसेनेकडे असलेल्या १० जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. वास्तविक आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लोकसभेच्या १२ शिवसेना खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. परंतु आता या १२ जणांच्या हक्काच्या मतदारसंघात कमळ फुलवण्याची योजना भाजपाकडून सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे या मिशनची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली आहे. त्यात साताऱ्यासह, कोल्हापूर, हातकणंगले जागांचाही समावेश आहे. सध्या महाराष्ट्रात शिवसेनेचे १८ खासदार आहेत, परंतु त्यातील १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेत. आगामी निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपा एकत्रित लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र कमळ चिन्हावर जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजपा नेत्यांनी रणनीती आखली आहे.
सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने आतापासून जबरदस्त प्लानिंग तथा नियोजनाला सुरुवात केली असून, केंद्रीय मंत्र्यांकडे देशभरातील लोकसभा मतदारसंघांच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्यात की नाही याची पाहणी करण्यासाठी ९ केंद्रीय मंत्री हे महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघात प्रवास करणार आहेत. महत्वाचे म्हणजे या प्रवासात हे नेते कार्यकर्त्यांशी संवाद आणि पक्ष संघटनेवर विशेष भर दिला जाणार आहे. याच लोकसभा मिशनची माहिती देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या १६ लोकसभा मतदार संघात ९ केंद्रीय मंत्री प्रवास करणार आहेत. १८ महिन्यांचा हा प्रवास असेल. या १८ महिन्यांच्या कालावधीत ६ वेळा केंद्रीय मंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत.
महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप सत्तेत येऊन दोन महिन्याचा कालावधी उलटला नाही तर त्यांच्यात आता धुसफुस सुरू झालेली दिसून येते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलढाण्यात एक विधान केले. त्यावरून शिंदे गटातील खासदार नाराज झाले होते. बुलढाण्यात कमळ चिन्हावरील खासदार निवडून आणून २०२४ मध्ये नरेंद्र मोदींचे हात बळकट करा असं आवाहन बावनकुळेंनी केले होते. त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बावनकुळेंना वरिष्ठांनी समज द्यावी असे म्हटले होते.
मागील काही दिवसांपासून केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री सत्यपाल सिंह बघेल पश्चिम महाराष्ट्रात मुक्काम ठोकून आहेत. राज्यात मिशन भाजपा अंतर्गत ४० हून अधिक खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. खरे म्हणजे कोल्हापूरात संजय मंडलिक, धैर्यशील माने हे खासदार शिंदे गटात सहभागी झाले असून आगामी काळात याठिकाणी शिंदे गटाचेच उमेदवार असतील असं म्हटले जात आहे. परंतु भाजपानं या मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून याबाबत चाचपणी केंद्रीय राज्यमंत्री अंदाज घेत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभेतील ४० आणि लोकसभेतील १२ खासदारांनी शिवसेना नेतृत्वा विरोधात बंड पुकारलं आहे. शिंदे यांनी भाजपासोबत हात मिळवणी करत खरी शिवसेना आम्हीच आहोत असा दावा केला आहे. त्याबाबत सुप्रीम कोर्टासह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रश्न प्रलंबित आहे. दोन्ही गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. बहुमताच्या आधारे आम्हालाच धनुष्यबाण चिन्ह द्यावं असा दावा शिंदे गटाने केला आहे. परंतु सुप्रीम कोर्टात न्याय प्रविष्ट आता हे प्रकरण घटनापीठाकडे सोपविण्यात आले आहे.
सध्या देशात ११३ लोकसभा मतदारसंघ आणि राज्यात १६ लोकसभा मतदारसंघ भाजपकडून जिंकण्याचे आव्हान म्हणून निवडण्यात आले. जिथे भाजप यापूर्वी निवडणूक लढवली नाही आणि जिंकलेली देखील नाही या मतदारसंघांमध्ये भाजपा केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहचवणार आहे. तसेच यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात बूथ कमिटी नेमून भाजप सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.
आम्ही ज्या जागा जिंकल्या आहेत, त्यावर आमचं लक्ष आहेच. मात्र, ज्या जागा जिंकायच्या आहेत, त्यावर आम्ही अधिक लक्ष देणार असल्याची माहिती फडणवीस यांनी पत्र परिषदेत दिली होती. केंद्रातील काही मंत्री या मिशन अंतर्गत राज्यात दौरे करणार असून, त्यात भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, आदींचा समावेश असेल असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेचे पुढील मतदारसंघ रडारवर असल्याची माहिती आहे. बुलडाणा- प्रतापराव जाधव, हिंगोली- हेमंत पाटील, पालघर- राजेंद्र गावित, कल्याण- श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे, दक्षिण मुंबई- अरविंद सावंत, शिर्डी- सदाशिव लोखंडे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग- विनायक राऊत, कोल्हापूर- संजय मंडलिक, हातकणंगले- धैर्यशील माने, यांचा समावेश आहे.
संपूर्ण देश भाजपमय होण्यासाठी या पक्षातील अगदी वरिष्ठ पातळीवरील केंद्रीय नेतृत्वापासून ते गाव पातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी जणू काही चंग बांधलेला दिसून येतो. त्यासाठी आगामी सर्व निवडणुका जिंकण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. विशेषतः सुमारे दोन वर्षानंतर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी भाजपाने जबरदस्त नियोजन टाकले आहे असे सांगण्यात येते.
सध्या भाजपनं २०२४ लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजप ने ज्या १६ लोकसभा मतदारसंघात युतीत शिवसेना निवडणूक लढवत असल्यामुळे कधीही निवडणूक लढवली नाही त्या मतदार संघाच्या ठिकाणी भाजपनं लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपनं मास्टर प्लान आखला आहे. परंतु आता यामध्ये शिंदे गटाच्या खासदारांना देखील धोका निर्माण झाला आहे.
Shinde Group Bjp Politics Strategy Upcoming Elections