मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईत आज सायंकाळी शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्ष वाढतच आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेण्यात आली आहे. त्यातच आता अंधेरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार याची उत्सुकता आहे. मात्र, आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले तर कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवायचे हे शिंदे गटाने निश्चित केले आहे.
बीकेसी मैदानावर आज होणाऱ्या दसरा मेळाव्याची अत्यंत जय्यत तयारी शिंदे गटाकडून सुरू आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर सुमारे ५० फुट तलवार ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मेळाव्याच्या प्रारंभी या तलवारीचे पूजन होणार असल्याचे समजते. त्याचप्रमाणे शिंदे गटाचे नेते आणि पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांना चांदीची तलवार भेट देणार असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे आता यापुढे शिंदे गटाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले नाही तर तलवार किंवा ढाल तलवार हे चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रयत्न केले जातील, असे दिसून येते.
निवडणूक आयोग चिन्हाबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु दोन्ही गटाच्या वाद किंवा भांडणांमध्ये कदाचित धनुष्यबाने चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही गटांना पर्यायी चिन्ह शोधण्याशिवाय पर्याय असणार नाही. साहजिकच शिंदे गटाने ढाल-तलवार हे नवीन निवडणूक चिन्ह मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगण्यात येते. खरे म्हणजे सुमारे ५० वर्षांपूर्वी शिवसेना ही फक्त एक प्रकारे सामाजिक संघटना होती आणि राजकीय पक्ष म्हणून तशी नोंद केली गेली नव्हती. त्यामुळे अशी नोंद होण्यापूर्वी अनेक निवडणुका लढवताना शिवसेनेला अधिकृत निवडणूक चिन्ह मिळलेले नसल्याने अन्य वेगवेगळ्या चिन्हांवर लढवल्या होत्या. त्यात कप बशी, ढाल तलवार, इंजिन अशी काही चिन्ह मिळाली होती.
१९८९ मध्ये शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले. तेव्हापासून सेनेचे सर्व उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवितात. पक्षाचे ते अधिकृत चिन्ह झाले आहे. आपले उमेदवार कोणत्याही निवडणुकांच्या रिंगणात उतरले की, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे धनुष्यबाणाचा गौरवाने उल्लेख करत. मात्र अनेक निवडणुकीसाठी शुभ संकेत ठरलेले धनुष्यबाण हे चिन्ह आता इतिहास जमा झाले तर, पर्यायी म्हणून तलवार किंवा ढाल तलवार हे चिन्ह शिंदे गटाने निश्चित केले आहे.
Shinde Group Andheri By Poll Election Decision
Politics Election Symbol