मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु त्यापूर्वीच शिंदे गट आणि भाजपचे काही पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे आता नेमकी कुणाची मंत्रिमंडळात वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन एक आठवडा लोटला आहे. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया पुढे गेली नाही. मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांची वर्णी लागणार याची प्रतीक्षा असतानाच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे- फडणवीस सरकारचे कार्यक्रम सुरू आहेत आहे. त्याच वेळी
रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल हे भ्रष्टाचारी असून खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी वाळू विक्रीत १५० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. भाजपची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी अशा भ्रष्टाचारी नेत्याला मंत्रीपद देऊ नका, अशी मागणी भाजपच्या ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष व रामटेक विधानसभा क्षेत्राचे प्रभारी डॉ. राजेश ठाकरे यांनी पत्रपरिषदेत केली. विशेष म्हणजे, शिंदे गटात सामील होऊन जयस्वाल यांच्या विरुद्ध भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने इतके गंभीर आरोप केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
डॉ. ठाकरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे आ. जयस्वाल यांनी केलेल्या भ्रष्टाराची सर्व कागदपत्रे पुराव्यासह पाठविणार आहे. त्यांना पत्र लिहून आमदार जयस्वाल यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद देऊ नये, अशी मागणी करणार आहेत.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी जयस्वाल यांच्या मर्जीतील लोकांनी धान खरेदी केंद्र उघडून राज्यातील नव्हे तर मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातील शेतकऱ्यांकडून आयात केलेले धान्य खरेदी केले. त्यातही कोट्यवधींचा भ्रष्टाचार जयस्वाल यांनी केला. एका शेतकऱ्यांचे धानविक्रीचे १४ लाख ५२ हजार रुपये जयस्वाल यांनी हडपल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. जयस्वाल यांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या नावावर कमी किमतीत खरेदी करून जास्त किमतीत विकल्या. ५० पेक्षा जास्त कंपन्या आमदार जयस्वाल यांनी नातेवाईकांच्या नावावर स्थापन केल्या आहेत.
लोहकरे हत्याकांड आणि साठवणे हत्याकांडाचेही धागेदोरे आमदार जयस्वाल यांच्याशी जुळत असल्याचा आरोप या पत्रपरिषदेत करण्यात आला. तसेच जयस्वाल यांनी कोट्यवधीचा गैरव्यवहार केला आहे. त्यांनी कोट्यवधीची जमीन विकत घेतली आहे. त्यांनी नातेवाईकांच्या नावाने संपत्ती घेतली आहे. त्यामुळे जयस्वाल यांची ईडी चौकशी करण्यात यावी. तसेच सीबीआयनेही चौकशी करावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.
Shinde Group and BJP Leaders Complaint this Rebel MLA to High command