मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काही वर्षांपूर्वी दिल्ली सरकारने ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा घडविण्याचा उपक्रम सुरू केला होता. त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला होता. ज्येष्ठ नागरिक हा एक मोठा वर्ग मतदार आहे. त्यामुळेच सरकारने अशा पद्धतीचा उपक्रम राबविला. महाराष्ट्र सरकारही आता त्याच पावलावर पाऊल टाकून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा घडविणार आहे.
दिल्ली सरकारने ही यात्रा ट्रेनद्वारे घडविली होती. महाराष्ट्र सरकार एसटीद्वारे हा उपक्रम राबविणार आहे. यातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची मते आपल्या बाजुने खेचण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्लान आहे, असे स्पष्ट होते. राज्य रस्ते परिवहन महामंडळाने यासाठी तयारी दाखविली असून राज्यात एकूण १ कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. या सर्वांना राज्यातील तीर्थस्थळांची सफर घडविण्यासाठी दोन हजार बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी महामंडळाने दाखविली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळांचा यात समावेश असणार आहे, असे सूत्रांकडून कळते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महामंडळाने ही सुविधा देताना काही अटी व नियम लागू केले आहेत. कदाचित त्यामुळे प्रतिसादावर परिणाम पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पैसे लागणारच
खरं तर एसटी महामंडळाने सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडविण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र यात ६५ वर्षांवरील नागरिकांना ५० टक्के तिकीट द्यावे लागू शकते. तशी अट या योजनेत समाविष्ट करण्याची तयारी झालेली आहे. तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण प्रवास मोफत घडविण्याचा हा प्रस्ताव आहे. शिवाय ज्येष्ठ नागरिकांनी निवासाचा खर्च स्वतःच करायचा आहे, असेही या योजनेत म्हटले आहे.
तर अर्थ काय
६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के तिकीटावर तीर्थयात्रा घडविण्याची घोषणा लवकरच होईल. पण मुळात आजही ज्येष्ठ नागरिकांना एसटीने प्रवास करण्यासाठी ५० टक्केच तिकीट भरावे लागते. अश्यात सरकारी योजनेची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो.
एसटीच्या उत्पन्नात वाढ
ही योजना फक्त आठवड्यातून शनिवार-रविवार या दोनच दिवशी असेल. या दोन दिवसांत शाळा, महाविद्यालये, कार्यालये बंद असतात. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात घट होते. या कालावधीत हा उपक्रम राबविला तर एसटीच्या उत्पन्नातही वाढ होईल, असे महामंडळाचे म्हणणे आहे.
Shinde Government Coming Soon New Scheme for Senior Citizens