मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नुकतेच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येच्या निमित्ताने बुधवारी रात्री एका स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत शरद पवार यांनीही स्टेज शेअर केला.
या कार्यक्रमात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे आमदारही यावेळी सोबत होते. शिवाय उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे देखील यावेळी एकाच व्यासपीठावर होते. एकूणच या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सचूक वक्तव्य केलं. मी, फडणवीस आणि पवार एकत्र आल्यानं काहींची झोप उडू शकते, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं. ते मुंबईत बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानं एकच हशा कार्यक्रमात पिकला होता.
राज्याच्या दिग्गज राजकीय नेत्यांसह भाजप आणि शिवसेनेचे इतर काही महत्त्वाचे नेतेही यावेळी उपस्थित होते. मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, आशिष शेलार, प्रताप सरनाईक यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण आकर्षण ठरलं.
शिंदेंनी साधला निशाणा
उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ते म्हणाले, “मी, फडणवीस आणि शरद पवार एकत्र असल्यानं काही जणांची झोप उडू शकते. मला आणि फडणवीस यांना थोडी थोडी बॅटिंग येते. तीन महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली. त्यामुळे सर्वांच्या आशीर्वादानं मॅच जिंकली. काहींचे मनापासून आशीर्वाद होते.” पुढे शरद पवारांना उद्देशून ते म्हणाले, “पवार साहेब आपण जे म्हणालात, त्याने आम्हाला आनंद झाला आहे. देवेंद्रजींनाही आनंद झाला आहे. तिकडे आशिषलाही आनंद झाला आहे. काही लोकांची काही लोकांची झोप उडू शकते ना तुमच्या वक्तव्यामुळे! पण त्यांच्या वक्तव्यामुळे आम्हाला आनंद झाला.”
https://twitter.com/mieknathshinde/status/1582786154666999809?s=20&t=Sk9R_qlM96-jki65nx6u0A
Shinde Fadanvis Pawar Politics Discussion
Maharashtra