मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नुकतीच अंधेरी पोटनिवडणुकीतून शिंदे गट – भाजपाने माघार घेतली असली तरी मुंबईसह राज्यातील पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येत आहे. हे सगळं सुरू असतानाच शिंदे सरकार अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार करत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खासकरुन शिंदे गटातील आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अनेक आमदारांना मंत्रिपदाचे आमिष देण्यात आल्याने त्यांच्या नजरा दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडेच लागल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या सरकारला चार महिने झाले तरी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार पहिल्यासारखाच लांबवला जात आहे. पहिल्या विस्तारात संधी न मिळाल्याने शिंदे गटात आलेल्या अनेकांचा हिरमोड झाला होता, शिंदेंनी त्यांना पुढच्याचा शब्द दिला होता. परंतू, हा विस्तार मुहूर्त लांबतच चालला आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण २० मंत्री आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत. ९ शिंदे गटाचे आणि ९ भाजपाचे मंत्री आहेत. एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार शिंदे सरकारकडून दुसरा मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे सध्यातरी प्रयत्न दिसत नाहीत. परंतु नाराज आमदारांना खुश करण्यासाठी त्यांच्याकडे महामंडळांची जबाबदारी देण्यात येणार आहे. यामुळे या आमदारांची नाराजी देखील दूर होईल आणि अध्यक्षपदे मिळाल्याने ते कामालाही लागतील, असा शिंदे-फडणवीस सरकारचे नियोजन असण्याची शक्यता आहे.
पहिला मंत्रिमंडळ विस्तारदेखील उशिरानेच
शिंदे सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तारदेखील उशिरानेच झाला होता. दोन महिने शिंदे आणि फडणवीसच कॅबिनेट निर्णय घेत होते. यावरूनही विरोधी पक्ष सरकारची खिल्ली उडवित होते. अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाला, परंतू, खात्यांवरूनही शिंदे गट आणि भाजपामध्ये वाटप होत नव्हते. अखेर त्या मंत्र्यांनाच त्यांच्या पसंतीची खाती कोणती ते विचारले गेले होते. ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना ते सोडून शिंदे गटात आलेल्यांना देखील यात स्थान देण्यात आले नाही. तसेच शिंदे गटात अनेकजण इच्छुक होते, त्यांनाही मंत्रीपद न मिळाल्याने ते देखील उघड उघड नाराजी व्यक्त करत होते. या सर्वांना शांत करण्याचा हा प्रयत्न आहे.
लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन
राज्यातील महामंडळांची अध्यक्षपदे ही गेल्या अनेक वर्षांपासून रिक्तच आहेत. ठाकरे सरकारनेदेखील महामंडळांवर नियुक्त्या केल्या नव्हत्या. तीन पक्षांतून देखील आवाज उठू लागला होता, परंतू कोरोनामुळे या नियुक्त्या केल्याच गेल्या नाहीत. शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनी देखील येत्या काही दिवसांत महामंडळ नियुक्त्यांवरून लवकरच निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे.
Shinde Fadanvis Government Cabinet Expansion Politics