मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर निश्चित झाली आहे. येत्या २० जुलै रोजी नवे मंत्री शपथ घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आतापर्यंत १७ किंवा १९ जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा होती. पण सर्व अटकळ सोडून नवी तारीख निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात दहा ते बारा जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होऊ न शकल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या निशाण्यावर होते, हे विशेष.
एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील शपथविधी पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार आहे. पहिल्या टप्प्यात भाजपचे ६ आमदार आणि शिंदे गटाचे जवळपास तेवढेच आमदार मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. त्याचवेळी या यादीत शिंदे गटातून कोणाचा समावेश होतो, हेही पाहायला मिळणार आहे.
१७ किंवा १९ जुलैला शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर सर्व आमदारांना मुंबईत यावे लागेल. त्यामुळे आमदारांना मतदारसंघातून पुन्हा मुंबईत यावे लागू नये यासाठी २० जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ४० आणि १० अपक्षांसह ५० आमदारांचा पाठिंबा आहे. शिंदे गटाला कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांसह एकूण १३ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे ५ सदस्य ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. त्यात गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, संदीपान भुमरे यांचा समावेश होता. याशिवाय शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार हे राज्यमंत्री राहिले आहेत.
Eknath Shinde Devendra Fadanvis Government Cabinet Expansion Date Fixed