नाशिक – नाशिक पुणे हायवे व नाशिक मुंबई हायवेवर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. तसेच शिंदे व घोटी टोलमध्ये असलेली सदोष यंत्रणा याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आलेले आहे. वाहतूकदारांना जर सुविधा मिळत नसतील तर टोल का भरावा असा प्रश्न वाहतूकदारासमोर आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत नाही तोपर्यंत टोल बंद करा अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे.
यावेळी शिंदे टोल येथील व्यवस्थापकांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष राजेंद्र फड, माजी अध्यक्ष जयपाल शर्मा , उपाध्यक्ष बापू टाकाटे, सुभाष जांगडा,उपाध्यक्ष सतीश कलंत्री,अमोल शेळके, पंकज भालेराव, रवि पेहरकर,बाबा शर्मा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी शिंदे टोलच्या व्यवस्थापकांनी तर ओव्हरलोड वाहनांचा सर्रास वापरा मुळे रोड खराब होत असल्याचे सांगितले. तसेच यासंबंधीचे निवेदन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज आहिरे,नॅशनल हायवे व्यवस्थापक, टोल व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,नाशिक पुणे हायवेवरील शिंदे पळसे व नाशिक मुंबई हायवेवरील घोटी टोल नाक्यावर वाहतुकदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. टोलच्या ठिकाणी असलेली फास्ट टॅगची सुविधा अतिशय कमी वेगवान आणि निष्क्रिय असून याठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. परिणामी टोल पास करण्यासाठी वाहतांना वाहनांच्या रांगा लागता अर्धातासाहून अधिक वेळ लागतो. त्यामुळे वाहतुकदारांचे मोठे नुकसान होत आहे.टोल परिसरात क्रेन,रुग्णवाहिका, युटर्नला बत्ती, रोडच्या कडेला सफेद पट्टा,स्वच्छता गृह स्वच्छ नाही याबाबत वारंवार तक्रारी देऊनही यामध्ये कुठल्याही सुधारणा होतांना दिसत नसल्याने वाहतुकदारामध्ये प्रचंड असंतोष असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, ज्या शिंदे पळसे व घोटी टोल नाक्यावर टोल घेतला जातो. त्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. याठिकाणी व्यवस्थानाकडून कुठलीही डागडुजी होतांना दिसत नाही. तसेच शासनाच्या नियमावली नुसार आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने वाहतुकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने सोयी नसलेल्या रस्त्यावर टोल का भरावा असा प्रश्न वाहतूक दारांपुढे आहे. टोलचा दर मात्र वाढवातचं आहे ही एक वासुळीच चालली आहे. वाहन कोणतेही असो त्याचा रोड टॅक्स मात्र आम्ही आगोदरच भरतो आणि नंतर फक्त टोल वसुली. आम्ही टोल द्यायला तयार आहोत मात्र टोल अंकित रोड आणि त्याच्या सर्व सुविधा चागल्या प्रतीच्या द्याव्यात. जोपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होणार नाही तोपर्यंत टोल घेऊ नये. जर टोल भरण्यास प्रशासनाने बळजबरी केली तर वाहतूकदार व नागरिक रस्तावर आल्याशिवाय राहणार नाही असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
टोल प्रशासनाने मागितली सात दिवसांची मुदत
रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सात दिवसांची मुदत टोल प्रशासनाने मागितली आहे. याबाबत टोल प्रशासन देखील सकारात्मक आहे. मात्र तरी देखील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झाले नाही. तर आक्रमक भूमिका घेत कुठलाही वाहतूकदार टोल भरणार नाही.तसेच सदोष अशा फास्ट टॅगच्या यंत्रणेमुळे मालवाहतूक दारांना स्कॅन न झाल्यास आपली वाहने पुन्हा मागे घ्यावी लागतात. यावेळी मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. आज निवेदन देण्यास गेलो असतांना आहे प्रत्यक्ष प्रकार बघायला मिळाला. यावेळी वाहन मागे घेत असतांना अपघात होऊन दोन गाड्यांचे नुकसान झाले. याचा फटका देखील वाहतुकदारांना बसत असल्याने यंत्रणा सुधारण्याची देखील मागणी केलेली आहे.