मुंबई – पॉर्न फिल्म प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राच्या बचावासाठी पत्नी शिल्पा शेट्टी समोर मैदानात उतरली आहे. राज कुंद्रा निर्दोष असून, तो अश्लील नव्हे तर इरोटिक चित्रपटांची निर्मिती करतो. तसेच हॉटशॉप अॅपशी आपला काहीही संबंध नाही, असे तिने म्हटले आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिल्पा आणि राज यांच्या जुहू येथील घरी सहा तास चौकशी केली होती. त्यानुसार शिल्पाने आपल्या पतीचा बचाव केला. राज अश्लिल चित्रपटनिर्मितीत सहभागी नाही, असा दावा तिने केला. राजची कंपनी वेब सीरिज आणि लघु चित्रपट निर्मिती करते, इतकेच आपल्याला माहिती आहे. इरॉटिक चित्रपट (कामोत्तेजक) असू शकतात मात्र ते अश्लील नाहीत, असा दावा शिल्पने केला आहे.
कुंद्राचे व्यावसायिक भागिदार आणि मेहुणे प्रदीप बख्शी हेच अॅपचे काम पाहतात. कुंद्राच्या कार्यालयातून मोबाईल आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केल्या जाणारे १०० हून अधिक अश्लील साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी पोलिसांना कुंद्राच्या वेगवेगळ्या १३ बँकांचे खाते आढळले आहेत. त्या खात्यांचे न्यायवैद्यक लेखापरीक्षण केले जात आहे. अफ्रिकेतील मर्क्युरी इंटनॅशनल कंपनीच्या युनायटेड बँक ऑफ अफ्रिकाशी सुद्धा कुंद्राच्या बँक खात्याचे लिंक समोर आले आहे. अफ्रिकेच्या या कंपनीकडून कुंद्राच्या येस बँकेच्या खात्यात मोठी रक्कम पाठविल्याची माहिती समोर आली आहे. अश्लील चित्रपट रॅकेटच्या मिळकतीतून मिळालेल्या पैशांचा वापर सट्टेबाजीत होत असल्याच्या संशयावरून पोलिस तपास करत आहेत.
ईडीकडूनही चौकशी शक्य
राज कुंद्राच्या अटकेनंतर नवे खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडूनही कुंद्राची चौकशी होण्याची शक्यता आहे. परंतु ईडीकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही. कुंद्राशी संबंधित पुरावे हाती लागल्यानंतर ईडी याप्रकरणी हस्तक्षेप करून फेमाअंतर्गत नोटीस जारी केली जाण्याची शक्यता आहे.
अभिनेत्री सागरिकाला धमकी
अश्लील चित्रपट प्रकरणी राज कुंद्राविरुद्ध साक्ष देणाऱ्या अभिनेत्री व मॉडेल सागरिका शोना सुमनला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तिने मुंबईच्या ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फोन कॉल, इंटरनेट आणि इतर माध्यमातून तिला धमकावले जात असल्याचे तिचे म्हणणे आहे.